

ind vs sa t20 series when and where to watch the all matches for free
मुंबई : केएल राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेला २-१ ने धूळ चारल्यानंतर, आता भारतीय क्रिकेट संघ (Team India) टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत त्यांच्याशी दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही ५ सामन्यांची मालिका ९ डिसेंबरपासून कटक येथील सामन्याने सुरू होणार आहे.
एकदिवसीय मालिकेत विराट कोहली, यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी शानदार शतके झळकावून भारतीय संघासाठी दमदार प्रदर्शन केले. आता टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा 'मिस्टर ३६०' अर्थात सूर्यकुमार यादव संघाची धुरा सांभाळणार आहे, तर आफ्रिकेची कमान एडन माक्ररम याच्या हाती असेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजक ठरणार आहे. दोन्ही संघात असे अनेक स्टार खेळाडू आहेत, जे काही चेंडूंमध्येच सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता ठेवतात. टी-२० क्रिकेटचे हे महारथी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी उत्सुक आहेत.
९ डिसेंबर रोजी कटकच्या मैदानावर मालिकेचा पहिला टी-२० सामना रंगणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ ११ डिसेंबरला न्यू चंदीगडमध्ये दाखल होतील. मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबरला धर्मशाला येथील नयनरम्य मैदानात खेळला जाईल.
पहिला टी-२० सामना : ९ डिसेंबर : कटक
दुसरा टी-२० सामना : ११ डिसेंबर : चंदीगड
तिसरा टी-२० सामना : १४ डिसेंबर : धर्मशाला
चौथा टी-२० सामना : १७ डिसेंबर : लखनऊ
पाचवा टी-२० सामना : १९ डिसेंबर : अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
भारतीय संघात कर्णधार सूर्यकुमार यादवसह शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंंड्या यांचा समावेश आहे. गोलंदाजीची कमान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्याकडे असेल. त्यांना युवा हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांची साथ मिळेल. फिरकीपटूंच्या विभागात कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती यांसारखे गुणवत्तापूर्ण खेळाडू आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामने नेहमीच रोमांचक ठरले आहेत. क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत जोरदार टक्कर दिली आहे. मात्र, जर आकडेवारी पाहिली, तर भारतीय संघाचं पारडं स्पष्टपणे जड असल्याचं दिसून येतं.
खेळलेले एकूण सामने : ३१
भारताने जिंकलेले सामने : १८
दक्षिण आफ्रिकेने जिंकलेले सामने : १२
रद्द : १
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, भारतीय संघाने आतापर्यंत झालेल्या ३१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी १८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर आफ्रिकेला केवळ १२ वेळाच यश मिळालं आहे. हा दमदार रेकॉर्ड पाहता, आगामी ५ सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असेल, यात शंका नाही.
लाईव्ह प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network)
स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर (उदा. Star Sports 1, Star Sports Hindi, इ.) हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर प्रादेशिक भाषांमधील कॉमेंट्रीसह हे सामने पाहू शकता.
डिजिटल लाईव्ह स्ट्रीमिंग : या संपूर्ण मालिकेचे लाईव्ह-स्ट्रीमिंग भारतात जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
सामन्याची वेळ : सर्व टी-२० सामन्यांसाठी टॉस संध्याकाळी ६:३० वाजता (IST) होईल. त्यानंतर ७ वाजता सामना सुरू होईल.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.
दक्षिण आफ्रिका : एडन माक्ररम (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डोनोवन फरेरा, रीजा हेंड्रिक्स, मार्को जेनसन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, लुथो सिपामला आणि ट्रिस्टन स्टब्स.