

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान, क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांच्यातील खास मैत्रीची झलक पाहायला मिळाली. कॉर्बिन बॉशच्या विकेटनंतर या दोन्ही खेळाडूंनी केलेला 'कपल डान्स' सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे आणि चाहत्यांची मनं जिंकत आहे.
विराट कोहली हा मैदानावरील आपल्या आक्रमक खेळीसोबतच त्याच्या उत्साही आणि मस्तीभऱ्या अंदाजामुळेही ओळखला जातो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यातही त्याची ही खास शैली पाहायला मिळाली.
हा क्षण सामन्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर पहायला मिळाला. कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशला कॉट अँड बोल्ड करत भारताला सामन्यातील आठवे यश मिळवून दिले. विकेट मिळाल्यानंतर कुलदीपच्या आनंदात सहभागी होण्यासाठी, 'किंग कोहली' त्याच्या जवळ आला. त्यानंतर या दोघांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून एक मजेदार आणि उत्साही 'कपल डान्स' केला आणि विकेटचा जोरदार जल्लोष केला.
विराट आणि कुलदीपच्या या सहज-सुंदर सेलिब्रेशनचा व्हिडीओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांनी या दोघांच्या मैदानाबाहेरच्या आणि मैदानावरील गहिऱ्या मैत्रीचे कौतुक केले आहे. या 'कपल डान्स'ने सध्या सोशल मीडियावर बरीच वाहवा मिळवली आहे आणि क्रिकेटप्रेमींसाठी हा एक मनोरंजक क्षण ठरला आहे.