

विशाखापट्टणम : भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अविश्वसनीय टप्पा गाठला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावा पूर्ण करण्याचा भीमपराक्रम केला.
या ऐतिहासिक कामगिरीसह, हिटमॅन रोहित आता मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, 'द वॉल' राहुल द्रविड आणि 'रन मशीन' विराट कोहली यांसारख्या दिग्गजांच्या '२०-हजारी क्लब'मध्ये सामील झाला आहे. २०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तो चौथे भारतीय फलंदाज ठरला आहे.
सचिन तेंडुलकर : ३४,३५७ धावा
विराट कोहली : २७,९१०* धावा
राहुल द्रविड : २४,२०८ धावा
रोहित शर्मा : २०,०४८* धावा
शनिवारी (६ डिसेंबर) झालेल्या या महत्त्वपूर्ण सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने केवळ ७३ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. या सामन्यापूर्वी रोहित या जादुई आकड्यापासून फक्त २७ धावा दूर होता, जो त्याने सहजतेने पूर्ण केला.
गेल्या पाच आंतरराष्ट्रीय डावांपैकी चारमध्ये ५० किंवा त्याहून अधिक धावांचा स्कोअर करणाऱ्या रोहितचा फॉर्म सध्या उत्कृष्ट आहे. विशेष म्हणजे, ३८ व्या वर्षीही ते कमालीचा फिट दिसत आहे. त्याने वजन कमी करण्यासाठी घेतलेले कष्ट चर्चेचा विषय ठरला आहे.
जागतिक क्रिकेटचा विचार केल्यास, रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावा पूर्ण करणारा जगातील १४ वा फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (६६४ सामन्यांत ३४,३५७ धावा) याच्या नावावर आहे.
एक दशकाहून अधिक काळ रोहित शर्माने भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्या फलंदाजीत तंत्रशुद्धता, संयम आणि आक्रमक शॉट्सचा एक अनोखा समन्वय पाहायला मिळतो. व्हाइट-बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या शानदार खेळीने भारताला अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवून दिले आहे. विशाखापट्टणममध्ये त्याने मिळवलेला हा टप्पा त्यांची मानसिक कणखरता, दीर्घकाळ क्रीझवर टिकून राहण्याची क्षमता आणि तिन्ही फॉरमॅटमधील त्यांच्या उत्कृष्ट खेळाची साक्ष देतो.