रणजित गायकवाड
विशाखापट्टणम येथे झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील निर्णायक एकदिवसीय सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने तुफानी फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील पहिले शानदार शतक झळकावले.
या शतकी खेळीमुळे त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) शतक ठोकणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे.
मालिका २-१ ने जिंकण्यासाठी विशाखापट्टणमच्या मैदानावर भारतासमोर २७१ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने आपल्या बॅटने कमाल केली.
त्याने ७५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तर त्यानंतर धावांची गती वाढवत अवघ्या १११ चेंडूंमध्ये आपले वनडे कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले.
जैस्वालने या शतकी खेळीत १० चौकार आणि १ षटकार लगावला. अखेरीस, तो १२१ चेंडूंमध्ये ११६ धावा (१२ चौकार आणि २ षटकार) काढून नाबाद राहिला आणि संघाला विजयाच्या जवळ नेले.
हे शतक यशस्वी जैस्वालसाठी केवळ वैयक्तिक यश नाही, तर त्याने या खेळीमुळे थेट भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एका खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
तो टी-२० आंतरराष्ट्रीय, कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे.
यापूर्वी, सुरेश रैना, केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दिग्गजांनी ही विशेष कामगिरी केली आहे.
अवघ्या २३ वर्षांच्या यशस्वी जैस्वालने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान मजबूत केले आहे आणि तो भविष्यात भारतासाठी एक मोठा आधारस्तंभ ठरू शकतो, यात शंका नाही