

Yuvraj Singh Samra CANvsNZ: युवराज सिंग सामरा... नाव ऐकल्यावर भारताच्या स्टार युवराजची आठवण झाली ना? मात्र हा कॅनडाचा युवराज आहे. तो देखील डावखुराच फलंदाज असून त्यानं भारतात सुरू असलेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये एक मोठा धमाका केला आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात युवराज सिंग सामरानं किवींची तगडी गोलंदाजी चांगलीच सोलून काढली. जरी ब्रॉडकास्टर त्याचं नाव युवराज सामरा असं दाखवत असले तरी त्याचे पूर्ण नाव हे युवराज सिंग सामरा असं आहे. त्यानं ११० धावांची धडाकेबाज खेळी करत आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला. या युवराज सिंग सामराच्या नावाची कहानी देखील धमाकेदार आहे.
युवराज सिंग सामराचे वडील बलजीत सामरा यांनी आपल्या मुलाचं नाव भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या नावावरून ठेवलं. आपला हा युवराज त्या युवराजसारखीच कामगिरी करून एक दिवस आपलं नाव इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी नोंदवेल याची त्यांना त्यावेळी पुसटशी देखील कल्पना नसेल.
मात्र युवराजनं 'युवराज' हे नाव राखलं अन् इतिहास रचला. कॅनडासाठी भारतातील टी २० वर्ल्डकपमध्ये पहिले दोन सामने आपली लय सापडण्यात गेले. मात्र त्यानंतर न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात कॅनडानं धमाकाच केला. कॅनडाने २० षटकात १७३ धावांपर्यंत मजल मारली. ही त्यांची टी २० वर्ल्डकपमधील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्यात युवराज सिंग सामरानं ११० धावांची शतकी खेळी केली.
सलामीला येणाऱ्या युवराजनं १९ व्या षटकापर्यंत फलंदाजी केली. त्याने गेल्या वर्षी मार्च महिन्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं बहामाविरूद्ध १५ चेंडूत अर्धशतक ठोकत आपली चुणूक दाखवून दिली होती. आज त्यानं ५८ चेंडूत ११० धावा ठोकत आपला दम पुन्हा दाखवला.
युवराजनं आपल्या शतकी खेळीत ११ चौकार मारले. तर ही खेळी त्यानं सहा षटकारांसह सजवली. या शतकी खेळीसोबतच असोसिएट देशांकडून टी २० वर्ल्डकपमध्ये शतकी खेळी करणारा सर्वात तरूण खेळाडू बनला. १९ वर्षे आणि १४१ दिवसाच्या युवराजनं इतिहास रचला. याचबरोबर युवराजसिंग सामराने पुरूष वर्ल्डकपमध्ये (वनडे वर्ल्डकपसह) देखील इतिहासातील सर्वत तरूण शतकवीर होण्याचा मान संयुक्तरित्या पटकावला आहे. त्यानं आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.