पुढारी ऑनलाईन : आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंचा पदकांचा धडाका कायम आहे. विशेषतः बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंनी वर्चस्व राखले आहे. भारताच्या तरुण आणि नितेश या जोडीने MD SL3-SL4 प्रकारात इंडोनेशियाचा ९-२१, २१-१९, २२-२० असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. भारताचे हे २४ सुवर्ण आहे. याआधी नितेश कुमारने बॅडमिंटनमध्ये पुरुषांच्या SL3 प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.
संबंधित बातम्या
आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने आतापर्यंत ९४ पदके मिळवली आहेत. यात २४ सुवर्ण, २७ रौप्य आणि ४३ कांस्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानी आहे. ४२३ पदकांसह चीन अव्वल स्थानी आहे.
२०१८ मध्ये भारताने १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३३ कांस्य अशी एकूण ७२ पदके मिळवली होती. पण यावेळी भारताने मागील पदकांचा आकडा पार केला आहे. आता भारत शंभर पदकांच्या जवळ पोहोचला आहे.
दरम्यान, तुलसीमथी मुरुगेसनने चीनच्या यांग क्विक्सिया हिचा २१-१९, २१-१९ असा पराभव करत बॅडमिंटनच्या SU5 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. तिने दुसऱ्या गेममध्ये ५-१६ पिछाडीवरुन पुनरागमन करत २१-१९ असा विजय मिळवला. याआधी मुरुगेसनने बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी SL3-SU5 इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.