IND vs PAK : विश्वचषकात भारताची पाकिस्तानवरील विजयाची सप्तपदी | पुढारी

IND vs PAK : विश्वचषकात भारताची पाकिस्तानवरील विजयाची सप्तपदी

भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये विश्वचषकात सात सामने झाले. या सर्वच सामन्यांमध्ये भारतानेच बाजी मारली आहे.

1992 (सिडनी, 4 मार्च) : भारताचा 43 धावांनी विजय
या स्पर्धेत पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान संघ एकमेकांसमोर होते. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सचिन तेंडुलकर (नाबाद 54) व अजय जडेजा (46) यांच्या जोरदार खेळीच्या जोरावर 7 बाद 216 धावसंख्येपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करणारा पाकिस्तानचा संघ 173 धावांवरच गारद झाला. आमीर सोहेलने संघाकडून 62 धावांची खेळी केली.

संबंधित बातम्या : 

1996 (बंगळूर, 9 मार्च) : भारताचा 39 धावांनी विजय
भारतामध्ये होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत हा सामनादेखील सर्वांच्या लक्षात राहिला तो आमीर सोहेल व वेंकटेश प्रसाद यांच्यामधील द्वंद्वसाठी ओळखला जातो. आमीरने प्रसादला काही चौकार मारल्यानंतर चिथवले; पण पुढच्याच चेंडूवर प्रसादने त्याला बाद केले. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने नवज्योतसिंग सिद्धू (93) व अजय जडेजा (45) यांनी जोरदार कामगिरी करत 8 बाद 287 धावसंख्येपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या पाकिस्तान संघाला 9 बाद 248 धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले.

1999 (मँचेस्टर, 8 जून) : भारताचा 47 धावांनी विजय
या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर 47 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारताने राहुल द्रविड (61), कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (59) व सचिन तेंडुलकर (45) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने 6 बाद 227 धावसंख्येपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या पाकिस्तान संघाला 180 धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले. भारताकडून वेंकटेश प्रसाद (5/27) व जवागल श्रीनाथ (3/37) यांनी चांगली गोलंदाजी केली.

2003 (सेंच्युरीयन, 1 मार्च) : भारताचा सहा विकेटस्ने विजय
सचिन तेंडुलकरच्या आक्रमक खेळीमुळे भारताला या सामन्यात विजय मिळवता आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या पाकिस्तान संघाने सलामीवीर सईद अन्वरच्या (101) शतकी खेळीच्या जोरावर 7 बाद 273 धावसंख्येपर्यंत मजल मारली. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर सचिन तेंडुलकरने आक्रमक सुरुवात केली. सचिनने 75 चेंडूंत 98 धावांची खेळी केली. यानंतर युवराज सिंग (50) व राहुल द्रविड (44) यांनी नाबाद खेळी करत संघाला 4 बाद 276 धावसंख्येपर्यंत पोहोचवत विजय मिळवून दिला.

2011 (मोहाली, 30 मार्च) : भारताचा 29 धावांनी विजय
या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत एकमेकांसमोर आले होते. पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाने सचिन तेंडुलकर (85) व वीरेंद्र सेहवागच्या (38) जोरावर 9 बाद 260 धावसंख्येपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला 231 धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले. पाककडून मिसबाह-उल-हकने 56 धावांची खेळी केली.

2015 (अ‍ॅडलेड, 15 फेब्रुवारी) : भारताचा 76 धावांनी विजय
विश्वचषकाची भारताची सुरुवात ही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने होण्याची ही पहिलीच वेळ होती. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने विराट कोहलीचे (107) शतक आणि शिखर धवन (73) व सुरेश रैना (74) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे 7 बाद 300 धावसंख्येपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या पाकिस्तान संघाला 224 धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले. भारताकडून मोहम्मद शमीने चार विकेटस् मिळवले, तर पराभूत संघाकडून मिसबाह-उल-हकने 76 धावांची एकाकी झुंज दिली.

2019 (मँचेस्टर 17 जून) : पाकचा 89 धावांनी धुव्वा
इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात भारताने पाकचा डकवर्थ-लुईस नियमाने 89 धावांनी धुव्वा उडवला. रोहित शर्माचे शतक आणि विराट, राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 336 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देणार्‍या पाकिस्तानच्या 35 षटकांत 6 बाद 166 धावा झाल्या असताना पाऊस आला. यात दहा षटकांचा खेळ वाया गेला. त्यामुळे उरलेल्या 5 षटकांत 136 धावा काढण्याचे अशक्यप्राय आव्हान पाकला मिळाले. हे पेलणे त्यांना शक्यच नव्हते. त्यांनी 40 षटकांत 6 बाद 212 धावांपर्यंत मजल मारली. पावसाची शक्यता गृहीत धरून नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे पाऊसही आला; पण त्यांचे काम आणखी अवघड करून गेला. शतकवीर रोहित शर्माला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button