ICC World Cup : न्यूझीलंडची विजयाची हॅट्ट्रीक, बांगलादेशला आरामात नमवले | पुढारी

ICC World Cup : न्यूझीलंडची विजयाची हॅट्ट्रीक, बांगलादेशला आरामात नमवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC World Cup : न्यूझीलंडने विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला. बांगलादेशचा पराभव करून त्यांनी सलग तिसरा विजय नोंदवला. किवी संघाने यापूर्वी इंग्लंड आणि नेदरलँड्सचा पराभव केला होता. आता त्यांचे तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. यासह किवींनी पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा हा दुसरा पराभव आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर त्यांना इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने 50 षटकांत नऊ गडी गमावून 245 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने 42.5 षटकात 2 बाद 248 धावा करत सामना जिंकला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक नाबाद 89 धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसनने 78 धावांची उपयुक्त खेळी केली. तो दुखापतीमुळे निवृत्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. डेव्हॉन कॉनवेने 45 धावांचे योगदान दिले. रचिन रवींद्र नऊ धावा करून बाद झाला. ग्लेन फिलिप्सने नाबाद 16 धावा केल्या. बांगादेशच्या मुस्तफिजुर रहमान आणि शाकिब अल हसन यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले.

246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या किवी संघाची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकातच संघाने रचिन रवींद्रची विकेट गमावली. मात्र त्यानंतर संघाने सावध फलंदाजी केली. केन विल्यमसनने डेव्हन कॉनवेसह सावध फलंदाजी करत संघाची दुसरी विकेट पडू दिली नाही. दोघांनी 80 धावांची भागीदारी केली. 45 धावा करून कॉनवे शाकिब अल हसनचा बळी ठरला आणि दोघांमधील भागीदारी तुटली.

विल्यमसनचे पहिल्याच सामन्यात अर्धशतक

92 धावांवर दुसरी विकेट गमावल्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने डॅरिल मिशेलसह न्यूझीलंडची धुरा सांभाळली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर विल्यमसनने डॅरिल मिशेलसोबत शतकी भागीदारीही केली. विल्यमसनने दुखापतीतून सावरत जबरदस्त पुनरागमन केले. तो 78 धावांवर दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने मिशेलसोबत 108 धावांची भागीदारी केली.

तत्पूर्वी, टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात खराब झाली. त्यांनी केवळ 67 धावांत 4 विकेट गमावल्या. लिटन दास 0, तनजीद हसन तमीम 16, मेहदी हसन मिराज 30 आणि नझमुल हुसेन शांतो 7 धावा करून बाद झाले. या सुरुवातीच्या झटक्यानंतर कर्णधार शकिब अल हसन आणि मुशफिकर रहीम यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या शंभरच्या पुढे नेली. शाकिब 40 धावा करून बाद झाला आणि दोघांमधील 96 धावांची भागीदारी तुटली. मुशफिकुर रहीमने आपले अर्धशतकही पूर्ण केले. तो 66 धावा करून बाद झाला आणि बांगलादेशच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याच्या आशा मावळल्या. त्याला मॅट हेन्रीने बाद केले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 3 बळी घेतले. ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी 2, तर मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

Back to top button