IND vs PAK Toss : टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी की गोलंदाजी? जाणून घ्या विश्वचषकातील टॉसचा इतिहास | पुढारी

IND vs PAK Toss : टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी की गोलंदाजी? जाणून घ्या विश्वचषकातील टॉसचा इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK Toss : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. या शानदार सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले असून खेळाडू सराव सत्रात मग्न आहेत. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. एकदिवसीय विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचा इतिहास खूप जुना आहे, ज्यात टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमधला पहिला वनडे विश्वचषक सामना 1992 तर अखेरचा सामना 2019 च्या स्पर्धेत खेळला गेला होता.

वर्ल्डकपमधील 8 वी लढत (IND vs PAK Toss)

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान आतापर्यंत एकूण 7 वेळा आमनेसामने आले आहेत. जिथे टीम इंडियाने सर्वच्या सर्व सात सामने जिंकले आहेत. शनिवारी अहमदाबाद येथे विश्वचषकाच्या इतिहासात हे दोन्ही संघांमध्ये 8व्यांदा लढत रंगणार आहे. दरम्यान, 1992 ते 2019 या कालावधीतील भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर त्या-त्या कर्णधारांनी कोणते निर्णय घेतले याबाबत जाणून घेऊया.

टॉसचा रंजक इतिहास (IND vs PAK Toss)

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची प्रत्येक चाहता आतुरतेने वाट पाहत आहे. या सामन्यात कर्णधार खेळपट्टीच्या आधारे टॉस जिंकल्यानंतरचा निर्णय ठरवेल. पण इतिहासावर नजर टाकली तर भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यात टॉस जिंकणाऱ्या कर्णधारांनी 6 वेळा प्रथम फलंदाजी करण्याचा आणि केवळ एकदाच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाने सातपैकी पाचवेळा टॉस जिंकले

टीम इंडियाने सातपैकी पाचवेळा तर पाकिस्तानने दोनदा टॉस जिंकले आहेत. यात भारताने प्रत्येक वेळी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तानने एकदा प्रथम फलंदाजी आणि एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रथम फलंदाजी करणारा संघच नेहमी फायद्यात असल्याचे दिसून आले आहे.

कोणत्या संघाने टॉस कधी जिंकला?

वर्ल्डकप 1992 : भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
वर्ल्डकप 1996 : भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
वर्ल्डकप 1999 : भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
वर्ल्डकप 2003 : पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
वर्ल्डकप 2011 : भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
वर्ल्डकप 2015 : भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
वर्ल्डकप 2019 : पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

Back to top button