पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubman Gill Player of Month : भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने अजूनही विश्वचषक स्पर्धेत एकही सामना खेळला नाही. आजारी असल्याने तो पहिल्या दोन सामन्याला मुकला आहे. पण असे असूनही त्याने आपल्या मागील चमकदार प्रदर्शनाच्या जोरावर अवघ्या क्रिकेट जगताला आपल्या खेळाने भुरळ पाडली आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल आता आयसीसीला घ्यावी लागली असून सप्टेंबर महिन्यासाठी त्याची 'प्लेयर ऑफ द मंथ' म्हणून निवड करण्यात आली आहे. या शर्यतीत गिलने आपला सहकारी मोहम्मद सिराज आणि इंग्लंडच्या डेव्हिड मलान यांना मागे टाकून पुरस्कारावर मोहोर उमटवली.
विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या एक दिवस आधी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या सकारात्मक बाबीमुळे उद्याच्या सामन्यात गिल मैदानात उतरला तर त्याचा आत्मविश्वास द्विगुणित होणार आहे. ज्याचा फायदा भारतीय फलंदाजीला होईल यात शंका नाही.
गिलने गेल्या महिन्यात आशिया कप स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 6 सामन्यांच्या 6 डावात 75.50 च्या चांगल्या सरासरीने आणि 93.49 च्या स्ट्राईक रेटने 302 धावा फटकावल्या. यादरम्यान, त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली. 121 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेच्या दोन सामन्यांतही त्याने 74 आणि 104 धावांची धडाकेबाज इनिंग खेळली होती. अशाप्रकारे सप्टेंबर महिन्यात खेळल्या गेलेल्या 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये गिलने 80 च्या सरासरीने 480 धावा वसूल केल्या. (Shubman Gill Player of Month)
'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ' हा सन्मान जिंकण्याची गिलची ही दुसरी वेळ आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. याआधी त्याला जानेवारी 2023 मध्ये त्याच्या जबरदस्त कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला होता. त्याच्याशिवाय ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांना प्रत्येकी एकदा हा सन्मान मिळाला आहे. (Shubman Gill Player of Month)
डेंग्यूमुळे गिलला चालू विश्वचषकात एकही सामना खेळता आलेला नाही. गिल यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मात्र, विश्वचषकापूर्वी त्याला डेंग्यूचे निदान झाले. संसर्गामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांना मुकला. आता गिलच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून गुरुवारी (12 ऑक्टोबर) तो सराव करताना दिसला. मात्र, 14 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी तो तंदुरुस्त होईल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आतापर्यंतचे पहिले दोन सामने जिंकले आहेत. आयसीसी विश्वचषकाच्या गुणतालिकेत सध्या द. आफ्रिका पहिल्या तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. भारत तिसऱ्या तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.
शुभमन गिल केवळ 24 वर्षांचा आहे आणि त्याने 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये 66.1 च्या सरासरीने आणि 102.84 च्या स्ट्राइक रेटने 1917 धावा केल्या आहेत. सध्या तो बाबर आझमनंतर आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र या दोघांमध्ये केवळ पाच गुणांचे अंतर आहे.