Cricket in Olympics 2028 : 128 वर्षांनी ‘क्रिकेट’चा ऑलिम्पिकमध्ये समावेश! लॉस एंजेलिसमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणार

Cricket in Olympics 2028 : 128 वर्षांनी ‘क्रिकेट’चा ऑलिम्पिकमध्ये समावेश! लॉस एंजेलिसमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Cricket in Olympics 2028 : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 128 वर्षांनंतर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली.

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर त्या प्रयत्नांना यश आले आहे. वास्तविक, क्रिकेटची लोकप्रियता लक्षात घेऊन आयओसी भारतीय उपखंडातील बाजारपेठेतून मोठी कमाई करण्याचा प्रयत्न करेल. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिकेटच्या समावेशासह, 2024 पॅरिस ऑलिम्पिकचे प्रसारण हक्क 158.6 कोटी रुपयांच्या तुलनेत 2028 मध्ये 1525 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.

तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन

यापूर्वी 1900 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये एकमेव क्रिकेट सामना खेळला गेला होता. हा सामना ग्रेट ब्रिटन आणि यजमान फ्रान्स संघ यांच्यात खेळला गेला. ज्यात ग्रेट ब्रिटनने बाजी मारून सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, त्यानंतर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये कधीच समावेश झाला नाही. 1904 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कोणताही संघ खेळण्यासाठी सापडला नाही आणि या खेळाला ऑलिम्पिकमधून बाहेर पडावे लागले होते. पण आता 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होण्याचा मार्ग सुकर झालेला आहे.

128 वर्षांपूर्वी 'त्या' सामन्यात काय घडले?

तेव्हा कसोटी सामने पाच दिवस चालायचे, पण पॅरिस ऑलिम्पिकमधील त्या सामन्यचा निकाल अवघ्या दोन दिवसांत (19 आणि 20 ऑगस्ट 1900) लागला. याशिवाय दोन्ही संघात 11 नाही तर 12 खेळाडू खेळले होते. ग्रेट ब्रिटनने प्रथम फलंदाजी करत 117 धावा केल्या. फ्रेडरिक कमिंगने सर्वाधिक 38 धावा केल्या. फ्रान्सकडून विल्यम अँडरसनने चार विकेट घेतल्या. तर अन्य तीन गोलंदाज अॅट्रिल, आर्थर मॅकइव्हॉय आणि डग्लस रॉबिन्सन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

प्रत्युत्तरात फ्रान्सचा संपूर्ण संघ 78 धावांवर गारद झाला. इंग्लिश गोलंदाज फ्रेडरिक ख्रिश्चनने फ्रेंच संघाचे कंबरडे मोडून सात फलंदाजांना माघारी धाडले. पहिल्या डावाच्या जोरावर ब्रिटनला 39 धावांची आघाडी मिळाली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ब्रिटनने आपला दुसरा डाव 145 धावांवर घोषित केला आणि फ्रान्सला 185 धावांचे लक्ष्य दिले. ब्रिटीश गोलंदाजांनी पुन्हा भेदक मारा करून फ्रान्सच्या फलंदाजांना लोटांगण घालण्यास भाग पाडले. अशाप्रकारे फ्रेंच संघाचा अवघ्या 26 धावांत चुराडा झाला आणि तो सामना ब्रिटनने 158 धावांनी जिंकला.

आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक काय म्हणाले?

आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख म्हणाले की, 'लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 आयोजन समितीने आयओसीपुढे पाच नवीन खेळांच्या समावेशाचा प्रस्ताव ठेवला होता. ज्यांना मान्यता देण्यात आली आहे. यात क्रिकेट, बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल आणि स्क्वॅश हे पाच खेळ आहेत. तथापि, सर्व नवीन खेळांना 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळण्यापूर्वी सोमवारी होणा-या मतदानात IOC सदस्यत्वाद्वारे मत जिंकणे आवश्यक आहे.'

'2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत आम्ही अजूनही प्रपोजल मोडमध्ये आहोत. सहभागी संघांची संख्या अद्याप स्पष्ट नाही. आम्ही आयसीसीसोबत काम करू. आम्ही कोणत्याही देशाच्या वैयक्तिक क्रिकेट अधिकाऱ्यांसोबत काम करणार नाही. आयसीसीच्या पाठिंब्याने आम्ही क्रिकेटला अधिक लोकप्रिय कसे करता येईल ते पाहू,' असेही बाक यांनी स्पष्ट केले.

6 संघांमध्ये टी-20 च्या लढती होण्याची शक्यता

आयसीसीने लॉस एंजेलिस 2028 समितीसमोर पुरुष आणि महिला दोघांसाठी स्पर्धा प्रस्तावित केल्या आहेत. ज्यात 6 संघांचा सहभाग केला जावा अशी मागणीही आयसीसी केली आहे. सहभागी संघ दिलेल्या तारखेला आयसीसी पुरुष आणि महिला टी-20 क्रमवारीत अव्वल 6 क्रमवारीतील संघ असतील. मात्र, या स्पर्धेच्या स्वरूपाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ऑलिम्पिकच्या माध्यमातून अमेरिकेतही क्रिकेटचा विस्तार होईल

गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटचा वेगाने विस्तार झाला आहे. अनेक देशांचे संघ या खेळात आपली छाप सोडत आहेत. अशातच 2024 मधील टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत करण्यात येणार आहे. यावरून असे दिसून येते की आयसीसी क्रिकेटच्या विस्तारात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकनंतर 2032 मध्ये ऑस्ट्रेलियात ऑलिम्पिक होणार आहे, जिथे क्रिकेट स्पर्धा पाहणे मनोरंजक असेल.

24 वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश

गेल्या वर्षी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. 1998 मध्ये पुरुषांच्या वनडे फॉरमॅटला राष्ट्रकुल स्पर्धेत स्थान मिळाले होते. त्यानंतर तब्बल 24 वर्षांनंतर हे घडले. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियन महिलांनी सुवर्णपदक पटकावले, तर टीम इंडियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news