IND vs PAK : भारताकडून विजयाचे घट बसवायची अपेक्षा | पुढारी

IND vs PAK : भारताकडून विजयाचे घट बसवायची अपेक्षा

 

निमिष पाटगावकर

अहमदाबाद : नवरात्राच्या आधी आज पितृपक्ष अमावस्येलाच अहमदाबाद आज एका सणासारखेच सज्ज आहे. विश्वचषक मग तो टी-20 असो वा पन्नास षटकांचा, जोपर्यंत भारत-पाकिस्तान सामना होत नाही, तोपर्यंत या स्पर्धेला खरा रंग भरत नाही. शुक्रवारी मी इथल्या शांतीचे विश्वदूत गांधीजींच्या आश्रमाला भेट दिली. त्या साबरमती काठच्या शांतीतून आज नरेंद्र मोदी स्टेडियमच्या एक लाख सदतीस हजार प्रेक्षकांच्या प्रचंड कोलाहलात संक्रमण करायचे आहे; पण याच कोलाहलात प्रत्येक भारतीयाला मन:शांती मिळणार आहे, ती भारत-पाकिस्तान विश्वचषकातील लढतींचा रेकॉर्ड भारताने अबाधित राखल्यावर. बाबर आझमला जेव्हा पत्रकार परिषदेत आतापर्यंतच्या 7-0 स्कोअरच्या दडपणाबद्दल विचारले तेव्हा तो इतिहास आहे वगैरे स्टाईलची स्टँडर्ड उत्तरे दिली. तो इतिहास आहे हे खरे; पण पाकिस्तानला आज भारतात इतक्या मोठ्या भारताच्या पाठिंब्यासमोर खेळायचे दडपण हे असणारच.

संबंधित बातम्या : 

दिल्लीला अफगाणिस्तानचा दणदणीत पराभव करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी आपले ऑस्ट्रेलियाविरुद्धचे अपयश पुसून टाकले. भारतीय संघातील बहुतांशी जागा पक्या आहेत; पण दोन जागांचा प्रश्न अजून सोडवायचा आहे. शुभमन गिल चेन्नईहून इथे पोहोचल्यावर त्याने गुरुवारी एक तासभर सराव केला. हा सराव पाकिस्तानच्या डावपेचांना गुगली देण्यासाठी होता का तो खरेच खेळेल याचे उत्तर आज सकाळपर्यंत गुलदस्त्यातच असणार आहे. हा सामना मोठा आहे; पण स्पर्धाही दीर्घ मुदतीची आहे तेव्हा शुभमन गिलने सराव केला, तरी तो मॅच फिट नसेल, तर तो खेळणार नाही हे नक्की. त्याबाबत निर्णय आज सकाळीच घेण्यात येईल. जर रोहित शर्मा आणि इशान किशनच भारताची सलामी असेल, तर या जोडीला पहिला पॉवरप्ले खेळून काढणे भारताच्या धावांच्या द़ृष्टीने गरजेचे आहे. रोहित शर्माला जगातील उत्तम जलदगती मारा जेव्हा गुडलेंग्थपेक्षा खोलवर टप्प्याचे चेंडू आत किंवा बाहेर वळवतात तेव्हा आपल्या पायाच्या हालचालींच्या मंदगतीमुळे त्याचे पायचीत अथवा विकेटमागे झेल देणे हा पाकिस्तानच्या अभ्यासाचा भाग नक्कीच असेल. यासाठी शाहिन आफ्रिदी आणि रौफ विरुद्ध खेळताना रोहित शर्माने क्रीजचा वापर करत चेंडूचा स्विंग रोखला पाहिजे. त्याच्याविरुद्ध बाऊंसरवर पूलच्या जाळ्यातही त्याला अडकवायचा प्रयत्न होईल. इशान किशन अफगाणिस्तानविरुद्ध खेळपट्टीवर उभा राहिला खरा; पण अजूनही ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवरचे त्याचे तंत्र सदोष आहे. कोहली, राहुल, अय्यर, पंड्या, जडेजा यांच्या जागेत बदल संभवत नाही.

अश्विन का शार्दूल हा प्रश्नच मुळात संभवत नाही. जर आपली फलंदाजी आठव्या क्रमांकाच्या शार्दूल ठाकूरच्या फलंदाजीवर अवलंबून असेल, तर ती चिंतेची बाब आहे. आपल्या फलंदाजांचा फॉर्म बघता शार्दूलच्या फलंदाजीचा वीस-पंचवीस धावांच्या टेकूची अपेक्षा ठेवण्यापेक्षा दोन-तीन बळी घेणारा किंवा टिच्चून गोलंदाजी करत धावा रोखणारा गोलंदाज केव्हाही उत्तम. तेव्हा या सामन्यासाठी एक तर अश्विन किंवा शमी, शार्दूल ठाकूरच्याऐवजी संघात असले पाहिजेत. भारताच्या गेल्या दोन्ही सामन्यांत सिराजचा प्रभाव पडला नाही. जलदगती गोलंदाज हे जोडीने शिकार करतात तेव्हा सिराज निष्प्रभ असेल, तर बुमराहला दुसरीकडून शमीची साथ योग्य ठरेल. पंड्या हा अजूनही तिसरा किंवा चौथाच गोलंदाज आहे. खेळपट्टी अगदीच संथ असेल, तर शार्दूलच्याऐवजी शमी किंवा फिरकीला साथ मिळायची शक्यता असेल, तर अश्विन संघात हवा. अश्विन आणि शमीचा पाकिस्तानविरुद्ध खेळायचा अनुभव नक्कीच कामी येईल.

पाकिस्तानच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग केल्याने त्यांचे मनोबल उंचावले आहेच; पण त्यांना शफिकच्या रूपाने फॉर्ममधला सलामीवीर मिळाला. इमान-उल-हकचा फॉर्म ही पाकिस्तानला अजूनही चिंताच आहे, पाकिस्तानची मुख्य मदार आहे ती रिझवान, बाबर, इफ्तिखार आणि शकील यांच्यावर. रिझवान हा असा खेळाडू आहे, जो सामन्याचा नूर पालटवू शकतो. गेल्या सामन्यात त्याला उष्णतेचा त्रास झाला तेव्हा नंतर उत्तर देताना त्याने कधी क्रॅम्प्स कधी अ‍ॅक्टिंग असे गमतीत उत्तर दिले; पण गेल्या टी-20 विश्वचषकात ‘आयसीयू’तून बाहेर येऊन तो मैदानात उतरला होता. जिगरबाज, खुन्नसने खेळणार्‍या पूर्वीच्या पाकिस्तानी पिढीचा तो प्रतिनिधी आहे. बाबर आझमला या विश्वचषकात अजून धावा काढता आल्या नाहीत आणि भारताविरुद्ध त्याचा रेकॉर्ड चांगला नाही. जसे जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा कणा मोडला तसा पाकिस्तानचा डाव कोसळण्यासाठी रिझवान, बाबर आणि इफ्तिखार यांना भारताला गुंडाळावे लागेल. बाबर आझमने नसीम शाहची उणीव भासेल, हे नमूद केले. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर आफ्रिदी, रौफ आणि हसन अली विरुद्ध श्रीलंकेने धावा लुटल्या. पाकिस्तानची फिरकी गोलंदाजी कमकुवत आहे. शादाबला अजून सूर आणि टप्पा या स्पर्धेत गवसलेला नाही.
खेळपट्टीचे स्वरूप फलंदाजीला पोषक असेल आणि दुसर्‍या डावात दव असेल तेव्हा नाणेफेकीचा कौल पुन्हा महत्त्वाचा असेल. दोन्ही संघांच्या बळाची कागदावर तुलना केली, तर भारताच्या रोहित शर्माला टक्कर द्यायला शफीकचा उदय झाला.

इमान-उल-हक आणि इशान किशन दोघे आपापल्या संघासाठी कच्चे दुवे आहेत. कोहली, राहुल, अय्यर, पंड्या ही फळी बाबर, रिझवान, शकील, इफ्तिखारपेक्षा जास्त मजबूत आहे. शादाब, मोहम्मद नवाज पेक्षा अष्टपैलू म्हणून पंड्या, जडेजा उजवे आहेत आणि फिरकीपटू कुलदीप हा आपला एक्का आहे. जलदगती गोलंदाजी दोन्ही संघांची तोडीस तोड आहे, असेच म्हणेन. ही कागदावरची बलस्थाने प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्यावर भारताने आज मैदानात उतरवली, तर निळ्या महासागराला जल्लोषाची भरती यायचे भविष्य आपण वर्तवू शकतो. देवीचे घट बसवायच्या आधी या महासामन्यात विजयाचे घट बसवायची तमाम भारतीयांची अपेक्षा पूर्ण करायला टीम इंडिया आज मैदानात उतरेल.

हेही वाचा : 

Back to top button