पुढारी ऑनलाईन : आशियाई क्रीडा स्पर्धेत विथ्या रामराजने (Vithya Ramraj) इतिहास रचला आहे. तिने भारताची दिग्गज माजी ॲथलीट पीटी उषा यांच्या राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी केली आहे. विथ्याने ४०० मीटर हर्डल्सची (अडथळा) शर्यत ५५.४२ सेकंदात पूर्ण केली. यासह तिने महिलांच्या ४०० मीटर हर्डल्स शर्यतीत पीटी उषाच्या ३९ वर्ष जुन्या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. १९८४ मध्ये पीटी उषा यांनी ही शर्यत ५५.४२ सेकंदात पूर्ण केली होती. आता विथ्यानेही अशीच कामगिरी केली आहे. (Asian Games 2023)
संबंधित बातम्या
यापूर्वी विथ्याची सर्वोत्तम कामगिरी ५५.४३ सेकंद इतकी होती. ती बहरीनच्या अमीनत ओए जमाल हिच्यासह हीट १ मधून थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. विथ्याने हीट १ मध्ये अव्वल स्थान मिळवले.
दरम्यान, दुसऱ्या हीटमध्ये कवेराम सिंचल रवी ५८.६२ च्या वेळेसह चौथ्या स्थानी राहिली. यामुळे पदक फेरीसाठी ती पात्र ठरू शकला नाही. तिचे एकूण स्थान दहावे राहिले.
विथ्याची बहीण नित्याही आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विथ्या आणि नित्या या भारतातील पहिल्या जुळ्या बहिणी आहेत. नित्याचा जन्म विथ्याच्या एक मिनिट आधी झाला होता. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कोईम्बतूरच्या रस्त्यावर ऑटो-रिक्षाही चालवली. नित्या महिलांच्या १०० मीटर हर्डल्स शर्यतीत तर विथ्या ४०० मीटर हर्डल्स शर्यतीत सहभागी झाली आहे.
रामराज आणि मीना यांच्या या जुळ्या मुली आहेत. त्यांचा जन्म कोईम्बतूर येथे झाला. २०१४ पर्यंत त्यांचे शिक्षण स्थानिक सरकारी शाळेत झाले. २०१४ मध्ये विथ्याने पदक जिंकले होते, पण पुढचा प्रवास खूप कठीण होता. प्रशिक्षक नेहपाल सिंह राठोड यांच्या मदतीने तिने पुन्हा कठोर मेहनत घेतली आणि २०२१ च्या फेडरेशन कपमध्ये ४०० मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर तिने ओपन नॅशनलमध्ये दुहेरी यश संपादन केले. यामुळे विथ्याला रेल्वेत नोकरी मिळाली. तर नित्या चेन्नईतील आयकर विभागात नोकरी करते. (Asian Games 2023)
हे ही वाचा :