पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 :भारतीय लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने आशियाई क्रीडा स्पर्धेत 8.19 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक जिंकले. 24 वर्षीय युवा खेळाडूने चीनच्या सुवर्णपदक विजेत्या वांग जियानपेक्षा फक्त 0.3 मीटर कमी उडी मारली. श्रीशंकरने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्य पदक जिंकले होते. दरम्यान, जेसविन आल्ड्रिनने हांगझोउ येथे पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत आठवे (7.76 मी) स्थान मिळविले.
महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये, नंदिनी अगासराने 2:15.33 च्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह 800 मीटर शर्यत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले. तर सीमा पुनियाने महिलांच्या डिस्कस थ्रो फायनलमध्ये हंगामातील सर्वोत्कृष्ट 58.62 मीटर थ्रो फेकून हँगझोऊ 2023 मध्ये कांस्यपदक जिंकले. 40 वर्षीय पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तिने 2014 मध्ये सुवर्ण, 2018 आणि 2023 मध्ये कांस्यपदकावर नाव कोरले.
भारताच्या ज्योती याराजीने 100 मीटर अडथळा शर्यतीत भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. तिने 12.91 सेकंदासह तिसरा क्रमांक पटकावला.
याआधी भारताच्या पुरुष आणि महिला धावपटूंनी रविवारी धमाकेदार कामगिरी नोंदवली. 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिला महिला धावपटू हरमिलन कौर बेन्स हिने रौप्य जिंकले. बहरीनच्या विनफ्रेड मुटाइल यावीने सुवर्णपदकावर कब्जा केला.
त्यानंतर काही वेळातच पुरुषांच्या स्पर्धेत अजय कुमारने (3:38.94) रौप्यपदक जिंकले, तर 2018 च्या सुवर्णपदक विजेत्या जिन्सन जॉन्सनने कांस्यपदक (3:39.74) नावावर केले. कतारच्या मोहम्मद अल गरनीने सुवर्णपदक जिंकले.
आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज आठवा दिवस आहे. भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ आणि सातव्या दिवशी पाच पदके मिळाली. त्यानंतर आज भारताने पदकांचे अर्धशतक पूर्ण केले.