Asian Games 2023 : नेमबाजीत भारताचा डंका : पुरूष संघाने सुवर्ण तर महिला संघाने रौप्य पदक पटकावले | पुढारी

Asian Games 2023 : नेमबाजीत भारताचा डंका : पुरूष संघाने सुवर्ण तर महिला संघाने रौप्य पदक पटकावले

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताकडून पदकांची कमाई सुरूच आहे. नेमबाजीतील ‘ट्रॅप-50’ प्रकारात पुरूष संघाने सुवर्ण तर महिला संघाने रौप्य पदक पटकावले आहे. (Asian Games 2023 )

भारताच्या पृथ्वीराज तोंडाईमन, किनान चेनई आणि झोरावर सिंग संधू या पुरुष संघाने ‘ट्रॅप-50’ सांघिक क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तर मनीषा कीर, प्रीती रजक आणि राजेश्वरी कुमारी यांनी नेमबाजीतील ‘ट्रॅप’ सांघिक क्रिडा प्रकारात स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. (Asian Games 2023 )

संबंधित बातम्या:

पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानी

भारत 41 पदके जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ आणि सातव्या दिवशी पाच पदके मिळाली. आठव्या दिवशी आतापर्यंत भारताच्या खात्यात तीन पदके जमा झाली आहेत. आतापर्यंत भारताच्या खात्यात 11 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कांस्य पदके आहेत.

आशियाई स्पर्धेतील आज (दि.30) सातव्‍या दिवशी भारताने विविध क्रीडा स्‍पर्धेत दमदार कामगिरी केली आहे.  या स्‍पर्धेत भारतीय खेळांडूनी आतापर्यंत एकूण ४१ पदकांची कमाई करत पदकतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जाणून घेवूया आजवरच्‍या भारताच्‍या नेमबाजी पदक विजेत्‍या खेळाडूंची कामगिरी…

  •  नेमबाजी, महिला १० मीटर एअर रायफल संघ : मेहुली घोष, रमिता आणि आशी चौकसी या संघाने महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत दुसरे स्थान मिळवून रौप्य पदक जिंकले.
  • नेमबाजी, महिला १० मीटर एअर रायफल वैयक्तिक : महिला सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या रमिता जिंदालने १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत २३०.१ गुणांसह कांस्यपदक जिंकले.
  • नेमबाजी, पुरुषांची १० मीटर एअर रायफल टीम : दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर या त्रिकुटाने यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. १८९३.७ च्या स्कोअरसह, त्यांनी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत संघाचा विद्यमान विश्वविक्रम मोडला.
  • पुरुषांची १० मीटर एअर रायफल वैयक्तिक : नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने इतर दोघांसह भारताला सांघिक स्पर्धेत आशियाई स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.त्याने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
  • पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल संघ : आदर्श सिंग, अनिश भानवाला आणि विजयवीर सिद्धू यांनी एकूण १७१८ गुणांसह भारतासाठी कांस्यपदक जिंकले.
  • ५० मीटर थ्री पोझिशन रायफल टीम : भारताने ५० मीटर थ्री पोझिशन सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे आणि मानिनी कौशिक यांच्या संघाने स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले.
  • २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धा : भारताने सुवर्णपदकावर कब्जा केला आहे. मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यांनी चीनला तीन गुणांनी हरवले. भाकरने दोन गुणांच्या आघाडीसह फेरीला सुरुवात केली.
  • ५० मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक : भारतीय खेळाडू नेमबाजीत चमकदार कामगिरी करत आहेत. भारताच्या सिफ्ट कौरने स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सिफ्ट कौर साम्राने ५० मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक स्पर्धेत १०.२ गुण मिळवून सहज सुवर्णपदक जिंकले.
  •  ५० मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक: सिफ्टने ५० मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर त्याच स्पर्धेत आशी चौकसेने कांस्यपदक जिंकले.
  •  भारतीय पुरुष स्कीट नेमबाजी : भारतीय पुरुष स्कीट नेमबाजी संघाने कांस्य पदक जिंकले. अंगद बाजवा, गुरज्योत सिंग खंगुरा आणि अनंत जीत सिंग नारुका या त्रिकुटाने एकूण ३५५ गुण मिळवले आणि अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावले.
  • महिला २५ मीटर पिस्तूल : ईशा सिंगने नेमबाजीत रौप्य पदक जिंकले. तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत ३४ गुण मिळवले आणि दुसरी राहिली.
  •  पुरुष १० मीटर एअर पिस्तूल : सरबज्योत सिंग, अर्जुन चीमा आणि शिव नरवाल यांच्या पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल संघाने चीनचा एका गुणाने पराभव केला. भारताने १७३४ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.

हेही वाचा:

Back to top button