विराट कोहली-रवी शास्त्री जोडीने भारतीय क्रिकेटला काय दिले? | पुढारी

विराट कोहली-रवी शास्त्री जोडीने भारतीय क्रिकेटला काय दिले?

दुबई ; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेटमधील एक पर्व संपुष्टात आले. विराट कोहली ने शेवटच्या टी-20 सामन्यात आपले कर्णधारपद भूषवले. तर, मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचादेखील हा शेवटचा सामना होता. सध्या सुरू असलेल्या टी- 20 विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरी गाठता आली नाही. याची सल या दोघांनाही असेल. या दोघांच्या कारकिर्दीचा शेवट फारसा चांगल्या पद्धतीने होत नसला तरी, दोघांनीही भारतीय क्रिकेटला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही.

समालोचन करत असताना नंतर प्रशिक्षकाच्या भूमिकेत आलेल्या शास्त्री यांना भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकवून देता आली नाही. मात्र, त्यांचा रेकॉर्ड हा मुळीच खराब नाही. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियामध्ये (2018-19) कसोटी मालिका जिंकणारा भारत हा आशियातील पहिला देश बनला. यानंतरदेखील 2020-21 मध्ये भारताने मालिका जिंकली.

भारत द्विपक्षीय टी-20 मालिकेत सर्व पाचही सामने जिंकणारा संघ बनला. भारताने न्यूझीलंडला 5-0 असे नमविले होते. भारताने आपल्या घरातील सर्व सात कसोटी मालिका जिंकल्या. भारत कसोटीमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आणि इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021 च्या फायनलमध्ये स्थान मिळवले.

कोहलीचा रेकॉर्डदेखील चांगला

विराट कोहली च्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत 49 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 29 सामने जिंकले. तर, 16 सामने गमावले आणि चार सामन्यांचा निकाल लागला नाही. एक कर्णधार म्हणून विराट कोहलीने भारतासाठी सर्वाधिक 1,489 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या. एम. एस. धोनीनंतर भारताचा तो दुसरा सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार आहे. त्याने 42 सामने जिंकले आहेत.

फलंदाज म्हणून कसा होता कोहली

विराटने कर्णधार म्हणून 30 डावांत 1 हजार टी-20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. तो एकमात्र भारतीय कर्णधारदेखील आहे. ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये न्यूझीलंडला 5-0 असे नमविले तर, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेवर 2-1 असा विजय नोंदवला. विराट संघाची निवड, मैदानावर त्याच्या आक्रमकतेमुळे कायम चर्चेत राहिला; पण आकड्यांचा विचार केल्यास तर तो भारताचा सर्वात चांगल्या कर्णधारांपैकी एक आहे.

प्रकार  सामने  विजयी  पराभव  ड्रॉ  टाय                                                                                                                           कसोटी  43     25        13       5    –
वन-डे   76      51        22       1   2
टी-20   64      42        18       2   2                                                                                                                                  एकूण  183    118        53       8   4

Back to top button