बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेचा (Poonam Pandey) पती सॅम बॉम्बेला पोलिसांनी अटक केली आहे. सॅम बॉम्बेने पूनम पांडेला मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पूनम पांडेने मुंबई पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सॅम बॉम्बेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम पांडे जखमी अवस्थेत तक्रार करण्यासाठी आमच्याकडे आली होती. तक्रार दाखल केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सॅम बॉम्बेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूनमच्या डोक्याला, डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
याआधी अभिनेत्री पूनम पांडेनेही तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून मारहाणीचा आरोप केला होता. २०२० मध्ये पूनम पांडेच्या तक्रारीवरून सॅम बॉम्बेलाही पोलिसांनी अटक केली होती. वास्तविक पूनमने २०२० मध्ये सॅम बॉम्बेसोबत लग्न केले आणि गोव्यात हनिमून दरम्यान सॅम बॉम्बेने पूनम पांडेवर हल्ला केला होता. त्यानंतर पूनम पांडेने पतीविरुद्ध पोलिसांत मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता आणि सॅम बॉम्बेला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
२ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतरच पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांनी लग्न केले. पूनम पांडेच्या म्हणण्यानुसार, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही सॅम बॉम्बे तिला अनेकदा मारहाण करायचा.
अश्लिल व्हिडिओप्रकरणी पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांना गोवा पोलिसांनी अटक केली होती. गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला विंगने काणकोण पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून अश्लिलता पसरवण्याच्या आरोपाखाली पूनम पांडे कायद्याच्या कचाट्यात सापडली होती. पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले होते.