Asian Games 2023 | भारताची प्रणती नायक हिचे जिम्नॅस्टिक्समध्ये पदक हुकले | पुढारी

Asian Games 2023 | भारताची प्रणती नायक हिचे जिम्नॅस्टिक्समध्ये पदक हुकले

पुढारी ऑनलाईन : हँगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची जिम्नॅस्टिक प्रणती नायक हिचे आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये महिलांच्या व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरीत पदक हुकले. प्रणती अंतिम फेरीत ८व्या स्थानावर राहिली. आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी प्रणती नायक ही एकमेव जिम्नॅस्ट होती. तिने व्हॉल्ट आणि ऑल- राउंड अंतिम फेरीत पात्र ठरण्यासाठी चांगली कामगिरी केली होती. मात्र, ती बुधवारी झालेल्या ऑल-राउंड प्रकारच्या अंतिम फेरीतून बाहेर पडली होती. तर गुरुवारी ती व्हॉल्टच्या अंतिम फेरीत ८व्या स्थानावर राहिली. (Asian Games 2023)

संबंधित बातम्या

उत्तर कोरियाच्या एन चांगोकने एकूण १४.०९० गुणांसह सुवर्णपदक जिंकले तर किम सोनह्यांगने १३.६०० गुणांसह रौप्यपदक जिंकले. चीनच्या यू लिनमिनने एकूण १३.५३३ गुणांसह कांस्यपदक मिळवले. तर प्रणतीला व्हॉल्टच्या दोन प्रयत्नात एकूण १२.३५० गुण मिळाले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायक व्हॉल्ट आणि ऑल-राउंडच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. तिने व्हॉल्टमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरताना १२.७१६ च्या सरासरी गुणांसह सबडिव्हिजन १ मध्ये अव्वल स्थान पटकावले होते.

२८ वर्षीय प्रणती ही पश्चिम बंगालची आहे. उल्लेखनीय म्हणजे हंगेरीतील एफआयजी वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर प्रणती नायकने मोठ्या आत्मविश्वासाने चांगली कामगिरी करत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. दीपा कर्माकरच्या अनुपस्थितीत आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रणती नायक हिच्याकडून पदकाची आशा होती होती.

कोण आहे प्रणती नायक?

प्रणती नायक २०१९ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेती आहे. दीपा कर्माकर आणि अरुणा रेड्डी यांच्यानंतर व्हॉल्ट प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय जिम्नॅस्ट आहे. तिने २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र ठरणारी ती दुसरी भारतीय महिला जिम्नॅस्ट आहे. ती २०१९ ची भारतीय ऑल-राउंड चॅम्पियनदेखील आहे. तिने २०१४ आणि २०१८ मध्ये कॉमनवेल्थ गेम्स, २०१४ आणि २०१८ आशियाई क्रीड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिने २०१४, २०१७ आणि २०१९ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला होता. (Asian Games 2023)

प्रणतीचा जन्म ६ एप्रिल १९९५ रोजी पूर्व मिदनापूर येथे झाला. तिचे वडील २०१७ पर्यंत पश्चिम बंगालमध्ये राज्य परिवहनमध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करत होते. तिची आई गृहिणी आहे. तिने सहा वर्षांची असताना जिम्नॅस्टिक खेळण्यास सुरुवात केली.

 हे ही वाचा :

Back to top button