Asian Games 2023 : भारताच्या इबाद अलीने ‘नौकानयन’मध्ये पटकावले कांस्यपदक | पुढारी

Asian Games 2023 : भारताच्या इबाद अलीने ‘नौकानयन’मध्ये पटकावले कांस्यपदक

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी कायम आहे. नौकानयन खेळात भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. इबाद अलीने उत्कृष्ट प्रदर्शन करत देशाला आणखी एक कांस्यपदक मिळवून दिले आहे. भारताच्या एकूण पदकांची संख्या आता 13 झाली आहे. याआधी नेहा ठाकूरने दिवसाचे पहिले पदक जिंकले होते.

पुरुषांच्या विंडसर्फर आयएएस एक्स स्पर्धेत इबादने चांगली सुरुवात केली, ज्यामुळे तो रौप्यपदक जिंकेल असा विश्वास वाटत होता. मात्र, 52 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. थायलंडच्या नत्थाफोंग फोननप्रातने 29 गुणांसह रौप्यपदक तर दक्षिण कोरियाच्या चो वोंवूने 13 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. (Asian Games 2023)

दिवसाचे दुसरे पदक

भारताचे हे आजच्या (दि. 26) दिवसातील दुसरे पदक ठरले. याआधी, 17 वर्षीय नेहा ठाकूरने महिला डिंगी नौकायन स्पर्धेत (सेलिंग) भारताला सिल्वर पदक मिळवून दिले. ‘नॅशनल सेलिंग स्कूल’ भोपाळची उदयोन्मुख खेळाडू नेहाने एकूण 32 गुणांसह तिची मोहीम फत्ते केली. तिचा निव्वळ स्कोअर 27 गुण होता, तिने थायलंडच्या सुवर्णपदक विजेत्या नोपसॉर्न खुनबुंजनला मागे टाकले आहे. (Asian Games 2023)

या स्पर्धेत सिंगापूरच्या किरा मेरी कार्लीला कांस्यपदक मिळाले. तिचा निव्वळ स्कोअर 28 होता. सेलिंगमध्ये एकूण धावसंख्येमधून खेळाडूंचा सर्वात खराब स्कोअर वजा करून निव्वळ स्कोअर काढला जातो. सर्वात कमी निव्वळ गुण मिळवणारा खेळाडू विजेता ठरतो. मुलींची डिंगी ILCA-4 ही स्पर्धा एकूण 11 शर्यतींचा समावेश होता. यामध्ये नेहाने एकूण 32 गुण मिळवले. या काळात पाचव्या शर्यतीतील तिची कामगिरी सर्वात खराब होती. नेहाला या शर्यतीत पाच गुण मिळाले. एकूण 32 गुणांमधून हे पाच गुण वजा केल्यावर तिचा निव्वळ स्कोअर 27 गुण होता. (Asian Games 2023)

आशियाई खेळांच्या इतिहासात भारताने आतापर्यंत नौकानयनात 20 पदके जिंकली आहेत. यामध्ये एका सुवर्णा व्यतिरिक्त 7 रौप्य आणि 12 कांस्य पदकांचा समावेश आहे. 2018 मध्ये झालेल्या स्पर्धेत बारातने एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले होते. (Asian Games 2023)

Back to top button