IPL 2023 : अक्षर पटेलला गोलंदाजी का दिली नाही? डेव्हिड वॉर्नरने सांगितली खास ‘रणनीती’ | पुढारी

IPL 2023 : अक्षर पटेलला गोलंदाजी का दिली नाही? डेव्हिड वॉर्नरने सांगितली खास 'रणनीती'

पुढारी ऑनलाईन डेस्क : आधी गोलंदाजीत मोहम्मद शमी, राशिद खान आणि नंतर फलंदाजीत साई सुदर्शनच्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सने दिल्लीवर स्वारी करून आपला सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यातील दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या रणनीतीची जोरदार चर्चा होत आहे. अक्षर पटेलला गोलंदाजी न देण्याच्या रणनीतीमुळे त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

दिल्लीला ८ बाद १६२ धावांत रोखल्यानंतर गुजरातने हे आव्हान १८.१ षटकांत पूर्ण केले. गुजरातच्या इनिंग दरम्यान अक्षर पटेलला गोलंदाजी दिली नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. सामन्यानंतर कर्णधार वॉर्नरने मात्र या रणनीतीवर आपले मत मांडले आहे. अक्षर पटेलला का गोलंदाजी दिली नाही याबाबतही त्याने सांगितले. वॉर्नर म्हणाला की, “हे खेळपट्टीमुळे झाले. या खेळपट्टीवर कुलदीप अधिक प्रभावी ठरेल असे आम्हाला वाटले. याशिवाय आमच्याकडे मार्शही होता. त्यामुळेच त्याला गोलंदाजी दिली नाही. खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत होता. चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त हवेत फिरत होता. अशा स्थितीत कशी फलंदाजी करायची हे गुजरातने दाखवून दिले आहे. घरच्या मैदानावर आमचे आणखी सहा सामने आहेत, आम्ही येथून शिकू आणि पुढे जाऊ.”

हेही वाचंलत का?

Back to top button