पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेचा संघ इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटू तयार करण्यासाठी ओळखला जातो. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन हा महान फिरकीपटूंपैकी एक होता. त्याच्यानंतर डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये रंगना हेराथने चांगली कामगिरी केली. जगातील महान डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. हा वारसा पुढे नेण्यासाठी आणखी एका गोलंदाजाने अशीच दहशत निर्मान केली आहे. तो म्हणचे प्रभात जयसूर्या (Prabath Jayasuriya).
श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने दाेन कसाेटीत आपल्या फिरकीच्या जोरावर अनेकांच्या दांड्या गुल केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करणाऱ्या प्रभात जयसूर्या कसोटीच्या दोन्ही डावात प्रत्येकी सहा विकेट्स घेतल्या आणि आता पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाच बळी घेत इतिहास रचला आहे. तीन डावात पाच विकेट घेणारा जयसूर्या हा श्रीलंकेचा पहिला आणि जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे.
वयाच्या ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रभातने या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरूद्ध दोन्ही डावात प्रत्येकी सहा विकेट आणि पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या डावात पाच बळी असा सलग तीन डावात पाच बळी घेणारा तो श्रीलंकेचा तिसरा फिरकी गोलंदाज ठरला. या बाबतीत त्याने मुथय्या मुरलीधरन आणि रंगना हेरथची बरोबरी केली.
प्रभात (Prabath Jayasuriya) पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत १७७ धावांत १२ बळी घेतले होते. यामध्ये भारताचा नरेंद्र हिरवानी (१६/१३६), ऑस्ट्रेलियाचा बॉब मेस्सी (१६/१३७) तर इंग्लंडचा फ्रेड मार्टिन (१२/१०२) यांच्यानंतर जास्त विकेट्स घेणार्यांमध्ये प्रभातचा नंबर लागतो.
पहिल्या तीन डावात पाच बळी घेणारा जयसूर्या जगातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडच्या टॉम रिचर्डसनने १८९३ मध्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेटने १९२६ मध्ये तिन्ही डावांत पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला. अशाप्रकारे ९६ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये हा पराक्रम केवळ तिसऱ्यांदा घडला आहे.
प्रभातने पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या डावातही पाच विकेट्स घेतल्यास पहिल्या चार डावात पाच बळी घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरेल. सध्या जयसूर्याने दोन सामन्यांच्या तीन डावात १७ बळी घेतले आहेत.
कसोटी कारकिर्दीतील तिन्ही डावांत पाच किंवा त्याहून अधिक बळी (Prabath Jayasuriya)
टॉम रिचर्डसन: १८९३
क्लेरी ग्रिमेट: १९२६
प्रभात जयसूर्या: २०२२
हेही वाचा