MAHARERA : विकासक, ग्राहकांसाठी ‘महारेरा’चं मोठं पाऊल ; प्रकल्पाची मिळणार अद्ययावत माहिती | पुढारी

MAHARERA : विकासक, ग्राहकांसाठी 'महारेरा'चं मोठं पाऊल ; प्रकल्पाची मिळणार अद्ययावत माहिती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजेच ‘महारेरा’  (MAHARERA) यांनी एक नवीन प्रमाणित संचालन प्रक्रिया म्हणजेच एसओपी तयार केली आहे. या एसओपीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या एसओपीमुळे ग्राहकांना त्यांनी गुंतवणूक केलेल्या प्रकल्पाबद्दल अद्ययावत माहिती ऑनलाईन मिळत राहणार आहे. त्यामुळे विकासक आणि ग्राहक यांच्या व्यवहारात पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.

(MAHARERA) राज्यात अनेक ठिकाणी विकासक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर व्यवहारांच्या अनेक तक्रारी प्राप्त होतात. अनेकदा प्रकल्प पूर्ण होण्यात काही कारणाने दिरंगाई झाली, तरी त्याबाबतची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नेमक्या याच कारणासाठी ‘महारेरा’ ने आता एसओपी तयार केली आहे. याद्वारे आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमधील सात वर्गांचे पालन करणे, विकासकाला बंधनकारक असेल. या सात वर्गांमध्ये ठराविक खात्यांमधून पैसे काढण्याची माहिती अद्ययावत करणे, प्रकल्प पूर्णत्त्वाबाबतची माहिती जमा करणे, भोगवटा प्रमाणपत्राचे तपशील जाहीर करणे, प्रकल्पाच्या स्थितीबद्दल त्रैमासिक आणि सहामाही माहिती ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने देणे आदींचा समावेश आहे.

‘ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल’

‘एसओपी’मुळे ग्राहकांना त्यांच्या प्रकल्पाच्या स्थितीची माहिती वेळोवेळी थेट विकासकाकडून ऑनलाईनच मिळेल. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास ‘महारेरा’ कडून व्यक्त करण्यात आला. तसेच बृहन्मुंबई डेव्हलपर्स असोसिएशन या विकासकांच्या संघटनेनेही या एसओपीचे स्वागत केले आहे. या निर्णयाचा चांगला परिणाम विकासक आणि ग्राहक या दोहोंवर होणार आहे. विकासक आणि ग्राहक यांच्यात विश्वासाचं नातं असणं महत्त्वाचं आहे.या एसओपीमुळे हे नातं दृढ होईल आणि व्यवहारात पारदर्शकता येईल, असे बृहन्मुंबई डेव्हलपर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष हरिश जैन यांनी सांगितले.

ग्राहकांना त्यांच्या प्रकल्पाची माहिती वेळोवेळी मिळाल्याने ग्राहकांचे समाधान होईल आणि विकासकांसाठी तीच मोठी गोष्ट आहे. त्याशिवाय विकासकांच्या विश्वासार्हतेतही यामुळे वाढ होईल, हा विकासकांचा फायदा असल्याचे मतही जैन यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button