

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी ( Presidential election 2022 ) सोमवारी (दि.१८) मतदान होणार असून, सर्वांचे लक्ष या मतदानाकडे लागले आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या दरम्यान होत असलेल्या या लढतीत मुर्मू यांचे पारडे जड आहे. विरोधी गोटातील असंख्य राजकीय पक्षांनी मुर्मू यांना पाठिंबा दिलेला असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
राष्ट्रपती निवडणुकीत संसदेच्या उभय सदनांचे निवडून आलेले खासदार तसेच सर्व राज्यांतील विधानसभांचे निवडून आलेले आमदार मतदान करतात. खासदार आणि आमदारांची एकूण संख्या 4 हजार 800 इतकी आहे. या मतदारांची मतसंख्या 10 लाख् 86 हजार 431 इतकी असून त्यातील साडेसहा लाखांच्या वर मते मुर्मू यांना मिळतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 21 तारखेला जाहीर केला जाणार आहे. नव्या राष्ट्रपतीला २५ तारखेला पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाईल. आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांचा या निवडणुकीत विजय झाला तर त्या देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती ठरतील. याशिवाय देशाच्या दुसऱ्या महिला व पहिल्या आदिवासी राष्ट्रपती बनण्याचा मानही त्यांना मिळणार आहे.
द्रौपदी मुर्मू यांना या निवडणुकीत सुमारे ६० टक्के मते पडण्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये संसद भवनात तसेच राज्यांच्या विधान मंडळात राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी मतदान होईल. दिल्ली आणि सर्व राज्यांतील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. मुर्मू यांना कोणत्याही आघाडीत सामील नसलेल्या व विरोधी गोटातील अनेक पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या पक्षांत वायएसआर कॉंग्रेस, बिजू जनता दल, बसपा, अण्णा द्रमुक, तेलगू देसम पार्टी, निजद, शिरोमणी अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा आणि अनेक छोट्या पक्षांचा समावेश आहे. दुसरीकडे यशवंत सिन्हा यांच्या बाजुने असलेल्या पक्षांत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल कॉंग्रेस, टीआरएस, सपा, आम आदमी पार्टी आदींचा समावेश आहे.
हेही वाचा :