बुमराहकडे भारतीय संघाचे नेतृत्व, ३५ वर्षांनी वेगवान गोलंदाजाला नेतृत्वाचा मान | पुढारी

बुमराहकडे भारतीय संघाचे नेतृत्व, ३५ वर्षांनी वेगवान गोलंदाजाला नेतृत्वाचा मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नियमित कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा बुधवारी दुसर्‍यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने उद्या, शुक्रवारपासून (1 जुलै) इंग्लंडविरुद्ध सुरू होत असलेल्या एजबस्टन कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी 29 वर्षांचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा नेतृत्व करेल. कपिलदेव यांच्यानंतर तब्बल 35 वर्षांनी एका वेगवान गोलंदाजाला भारताचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला, हे विशेष.

लिसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान रोहितला कोरोनाची लागण झाली होती. बुधवारी त्याची दुसर्‍यांदा चाचणी झाली, त्यातही तो पॉझिटिव्ह आढळला. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेदरम्यान बुमराहला भारताचा उपकर्णधार म्हणून बढती देण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत बुमराहने संधी मिळाल्यास कर्णधारपद स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले होते. बुमराहशिवाय ऋषभ पंत व विराट कोहली यांची नावे कर्णधारपदासाठी होती.

कपिलनंतर बुमराह

बुमराह हा कपिलदेव यांच्यानंतर भारताचे कर्णधारपद भूषविणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरेल. मार्च 1987 ला कपिलदेव यांच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर 35 वर्षांत दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, कृष्णम्माचारी श्रीकांत, मोहम्मद अझहरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी कसोटी संघाची धुरा सांभाळली आहे.

विराट कोहलीचा नकार?

रोहितच्या अनुपस्थितीत कोहलीच्या कर्णधारपदाची शक्यता होती; पण निवड समितीने बुमराहला निवडले. दुसरीकडे, ज्या पद्धतीने विराटकडून नेतृत्व काढून घेण्यात आले त्यावर तो निराश होता. आता स्वत:च्या फलंदाजीवर लक्ष देण्याची सबब देत त्याने असमर्थता कळविलेली असावी.

36 वा कर्णधार

भारताने 1932 ला पहिली कसोटी खेळली. तेव्हापासून कसोटीत देशाचे नेतृत्व करणारा बुमराह 36 वा कर्णधार ठरला आहे. गुजरातच्या या वेगवान गोलंदाजाने 29 कसोटी सामन्यांत 123 गडी बाद केले आहेत.

Back to top button