नोवाक जोकोविचने रागाच्या भरात चेंडू मारला, आणि तो थेट महिला अधिकाऱ्याच्या तोंडावर आदळला! (video)
न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा प्रबळ विजेदार नोवाक जोकोविचला मानले जात असतानाच स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली. त्याने रागाच्या भरात केलेल्या कृतीने स्पर्धेतून बाद होण्याची वेळ आली. नोवाक जोकोविचने रागाच्या भरात नकळत चेंडू मारला. हा चेंडू थेट लाइन पंच असलेल्या महिला अधिकाऱ्याला जाऊन लागला. ही घटना रविवारी चौथ्या फेरीतील सामना सुरू असतानाच घडली.
Oh my god, Djokovic got disqualified from the US Open.pic.twitter.com/yCo3Lqw0tg
— Dov Kleiman (@NFL_DovKleiman) September 6, 2020
या प्रकारामुळे स्पर्धेतून त्याला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याचे त्याचे स्वप्न भंगले. सर्बियन नोवाक जोकोविच आणि स्पेनचा पाब्लो करेनो बुस्टा यांच्यात लढत होती. या लढतीत जोकोविच पहिल्या सेटमध्ये ५-६ अशा पिछाडीवर असताना त्याने रागाच्या भरात चेंडू मारला. हा चेंडू कोर्टवर असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला लागला आणि त्या कोसळल्या.
महिलेला चेंडू लागल्याची चूक लक्षात येताच तो ताबडतोब त्यांच्याकडे धावून गेला. या घटनेनंतर रेफरी सोरन फ्रीमल यांनी पंचाशी चर्चा करून बुस्टाला विजयी घोषित केले. या घटनेनंतर जोकोविचला निराशा लपवता आली नाही. कोर्टवरील घटनेनंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत झाल्या प्रकारावर दुःख झाल्याचे सांगितले.