उडता पंजाब, बुडता आरसीबी | पुढारी | पुढारी

उडता पंजाब, बुडता आरसीबी | पुढारी

दुबई : वृत्तसंस्था

सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध आपला पहिला सामना जिंकून विजयी सलामी देणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आपल्या दुसर्‍या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्यांचा 97 धावांनी पराभव केला. के. एल. राहुलच्या धडाकेबाज नाबाद शतकी खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेेंगलोरविरुद्ध 206 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना आरसीबीचा संघ 109 पर्यंतच मजल मारू शकला. पंजाबच्या राहुलने कर्णधारपदाला साजेशी खेळी करताना 69 चेंडूंत 132 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 7 षटकार ठोकले. त्याला ‘सामनावीर’चा पुरस्कार देण्यात आला.   

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या द्विशतकी आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेेंगलोरकडून तडाखेबंद सुरुवातीची अपेक्षा होती. परंतु, देवदत्त पडिक्‍कल (1), जोश फिलिप्पे (0) आणि विराट कोहली (1) हे तीन खंदे वीर केवळ 4 धावांत तंबूत परतल्याने आरसीबीचे जहाज भरकटले. यानंतर अ‍ॅरोन फिंच आणि ए. बी. डिव्हिलीयर्स यांनी थोडी फटकेबाजी करून आरसीबीच्या शिडात हवा भरण्याचा प्रयत्न केला. परंतु, युवा लेगस्पीनर रवी बिश्‍नोई याने फिंचचा (20) त्रिफळा उडवून ही आरसीबीच्या शिडातील हवा काढून घेतली. पुढच्याच षटकांत भरवशाचा ए. बी. डिव्हिलीयर्स (28) याला एम. अश्‍विनने झेलबाद केले आणि आरसीबीचे टायटॅनिक होण्यावर शिक्‍कामोर्तब केले. त्यांच्या वॉशिंग्टन सुंदर (30) आणि शिवम दुबे (12) यांचे प्रयत्नही तोकडे पडले. आरसीबीचा डाव 17 षटकांत सर्वबाद 109 धावांवर आटोपला. 

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबचा कर्णधार के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी 6 षटकांत 50 धावा फलकांवर लावल्या. आरसीबीसाठी डोकेदुखी ठरलेली ही जोडी फोडण्यासाठी कोहलीला आपला हुकमी एक्‍का बाहेर काढावा लागला. सातवे षटक टाकण्यासाठी आलेल्या युजवेंद्र चहलने कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरवला आणि मयंक अग्रवालचा (26) त्रिफळा उडवला. दरम्यान, के. एल. राहुलने 36 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. 

मागील सामन्यात शून्यावर बाद झालेला निकोलस पूरन (17) या सामन्यातही अपयशी ठरला. पूरनच्या जागी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलला फक्‍त 5 धावांतच दुबेने माघारी धाडले. यानंतर मात्र के. एल. राहुलने सामन्याची सर्व सूत्रे स्वत:कडे घेत चौफेर टोलेबाजी सुरू केली. यामुळे पंजाबचा धावफलक टॅक्सीच्या मीटरप्रमाणे पळू लागला. यात ‘फिट अँड फाईन’ समजल्या जाणार्‍या विराट कोहलीने राहुलचे दोन झेल सोडून त्याला हातभार लावला. अठराव्या षटकाअखेर नव्वदीत पोहोचलेल्या राहुलने डेल स्टेनला आधी षटकार आणि नंतर चौकार ठोकून 62 चेंडूंत शतक पूर्ण केले. यंदाच्या आयपीएलमधील हे पहिले शतक ठरले. आरसीबीच्या गोलंदाजांनी शेवटच्या चार षटकांत 74 धावांचा ‘अधिक मास आहेर’ दिल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला 200 चा टप्पाही ओलांडता आला. 20 षटकांत पंजाबने 3 बाद 206 धावा केल्या होत्या. 

संक्षिप्‍त धावफलक

किंग्ज इलेव्हन पंजाब : 3 बाद 206 धावा. (के. एल. राहुल नाबाद 132,  करुण नायर नाबाद 15. युजवेंद्र चहल 1/25.)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : 17 षटकांत सर्वबाद 109 धावा. (वॉशिंग्टन सुंदर 30, ए. बी. डिव्हीलियर्स 28, बिश्‍नोई 3/32.)

Back to top button