IPL2020 : नटराजन एका 'ग्रामीण टॅलेंटची' फरफेक्ट सक्सेस स्टोरी  | पुढारी

IPL2020 : नटराजन एका 'ग्रामीण टॅलेंटची' फरफेक्ट सक्सेस स्टोरी 

आयपीएल ही व्यावसायिक  टी – २० स्पर्धा तशी आंतरराष्ट्रीय दर्जाची मानली जाते. या स्पर्धेत पैसा, ग्लॅमर, स्टारडम या सगळ्या गोष्टी असल्या तरी आयपीएलमधील कधी कधी काही अस्सल मातीतल्या, तळागाळातील गोष्टीही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. आयपीएलच्या १३ व्या हंगामातही अशीच तळागाळातील एक गोष्ट म्हणजे सनराईझर्स हैदराबादचा टी. नटराजन. भारताला याच आयपीएलने बुमराहसारखा यॉर्कर स्पेशलिस्ट दिला आहे. आता भारतातून डेथ स्पेशलिस्टमध्ये अजून एक नवे टॅलेंट समोर आले आहे. डावखुऱ्या नटराजनने यंदाच्या हंगामात आपल्या यॉर्कर गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. याच डेथ ओव्हरमधल्या प्रभावी गोलंदाजीने त्याला टीम इंडियाची दारे उघडून दिली आहेत. 

ज्या प्रमाणे नटराजनने त्याच्या यॉर्करने सर्वांना प्रभावित केले त्या प्रमाणे त्याच्या सक्सेस स्टोरीही सर्वांना प्रेरित करणारी आहे. टी. नटराजन हा मुळचा तामिळनाडूचा. तो तामिळनाडूमधील एका छोट्या खेडेगावात जन्मला. त्याचा फक्त जन्म खेडेगावातील नाही तर यशाच्या शिखरावर पोहचला तरी तो या गावातच राहतो. त्याचे वडील रोजंदारीवर काम करतात. ते हातमाग कामगार आहेत. त्याची आईही नटराजनच्या वडिलांना चिकन शॉप चालवून हातभार लावते. नटराजन हा पाच भावंडात सर्वात मोठा, त्याच्या पाठीवर तीन बहिणी आणि एक भाऊ आहेत. सर्वसाधारण हातावरची पोटं असलेल्या घरात इतकी पोटं सांभाळायची तर जितकी माणसे लवकरात लवकर कामाला लागतील तितकं बरं असतं. त्यामुळे घरातला मोठा मुलगा लगेचच कामाधंद्याला लागतो. 

पण, नटराजनने वेगळे स्वप्न पाहिले, त्याला क्रिकेटर व्हायचे होते. तो तामिळनाडूत टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून चांगला फेसमही होता. पण, भावंडातील सर्वात मोठ्या नटराजनला त्याचा मोठा भाऊ भेटला. नटराजनचा शेजारी जयप्रकाश हा त्याच्यासाठी मोठ्या भावासारखा आहे. तो एक स्थानिक क्रिकेट क्लब चालवतो. त्यानेच या टेनिसबॉल यॉर्कर स्पेशालिस्टला सिजन बॉलवर क्रिकेट खेळण्यास प्रवृत्त केले. आता सिजन बॉल क्रिकेट खेळायचे म्हणजे खर्च आलाच आणि नटराजनची घरची परिस्थिती तर बेताची होती. पण, नटराजनच्या या मोठ्या भावाने त्याची सर्व काळजी घेतली. त्याला क्रिकेट करिअरसाठी योग्य अशा कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून दिले. जयप्रकाशने नटराजनला चेन्नईला आणले. त्यानेच नटराजनसाठी किटची व्यवस्था केली. जयप्रकाशने नटराजच्या घरच्यांना नटराजनची सर्व काळजी घेण्याचे आश्वासन दिले. जयप्रकाशला नटराजनमध्ये चांगला स्पार्क दिसला होता. 

जयप्रकाशच्या या सर्व मेहनतीला नटराजननेही चांगला प्रतिसाद देत अपार कष्ट उपसले. त्याच्या खेडेगावात सोयी सुविधांची वणवा होता. नटराजन जवळपास दोन वर्षे बिना शूज खेळत होता. या सर्व आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत नटराजनने तामिळनाडू कडून रणजी ट्रॉफीत डेब्यू केला. नटराजन आता मार्गी लागला असं आपल्याला वाटत असेल. पण, ज्या टेनिट क्रिकेटने त्याला सुरुवातीची ओळख मिळवून दिले होती. तेच टेनिस बॉल क्रिकेट आता त्याच्या मुळावर उठले होते. कारण, नटराजनला रणजीच्या पहिल्याच सामन्यात बॉलिंग अॅक्शनची वॉर्निंग मिळाली होती. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणीही गोलंदाजीच्या शास्त्रशुद्ध तंत्रासाठी आग्रही नसते. त्यामुळे अनेक गोलंदाज टेनिस बॉल वेगाने टाकण्यासाठी आपला हात बेंड करतात. 

नटराजनला या वॉर्निंगमुळे आपली दोषपूर्ण बॉलिंग अॅक्शन सुधारण्यासाठी एक वर्षाचा गॅप घ्यावा लागला. व्यावसायिक क्रिकेटमधून एक वर्ष गॅप म्हणजे जवळपास क्रिकेट करिअर संपल्यातच जमा असते. कारण तोपर्यंत नवे स्पर्धक गोलंदाज त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करुन संघातील जागा पक्की करतात. याचा परिणाम नटराजनच्या मानसिकतेवरही झाला. पण, अखेर त्याने आपल्या सुधारित बॉलिंग अॅक्शनसह तामिळनाडू प्रीमियर लीगचा २०१७ चा हंगाम गाजवला. त्याने ७ सामन्यात १० विकेट घेतल्या. त्याने एका सुपर ओव्हरमध्ये पाठोपाठ सहा अॅक्युरेट यॉर्कर टाकले. त्यानंतर त्याचा रणजी हंगामही चांगला गेला. 

नटराजनची तामिळनाडू प्रीमियर लीगमधील ती सुपर ओव्हर त्याचे नशीब बदलून गेली. किंग्ज इलेव्हन पंजाबने २०१७ ला त्याच्यावर तब्बल ३ कोटी रुपयांची बोली लावली.  पण, त्यानंतरही नटराजनच्या करिअरमध्ये एक ड्रॉप आला. त्याचा २०१७ चा हंगाम म्हणावा तसा गेला नाही. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला रिलीज केले. त्यानंतर त्याला सनराईजर्स हैदराबादने २०१८ च्या लिलावात ४० लाखाला घेतले. नटराजनची व्हॅल्यू कमालीची घसरली होती. त्यातच हैदराबादने त्याला २०१८ आणि २०१९ मध्ये एकाही सामन्यात वापरले नाही. असे असले तरी या दोन वर्षात नटराजनचे हैदराबादचा गोलंदाज प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन बरोबर चांगले संबंध निर्माण झाले. 

दरम्यानच्या काळात नटराजनने दोन गोष्टींवर आपार मेहनत घेतली. त्याने आपल्या इन स्विंगवर काम केले आणि त्याने वेगात गोलंदाजी करता यावी यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरु केले. त्याने डाएट फॉलो केला आणि जीममध्ये घाम गाळला. नटराजनने आपली बॉडी ट्रान्सफॉर्म केली. त्यानंतर यंदाच्या हंगामात नटराजनच्या कष्टाची त्याला फळे मिळायला लागली. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नटराजनवर प्रचंड विश्वास दाखवत त्याला फक्त अंतिम अकराच्या संघात घेतले नाही तर डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची जबादारीही दिली. हैदराबादकडून डेथ ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार सातत्याने गोलंदाजी करत होता. पण, तो जायबांदी झाल्याने आयपीएल अर्धवट सोडून माघारी परतला होता. पण, हैदराबादकडून डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची जबाबदारी नटराजनने आपल्या खांद्यावर घेत लिलया पेलली. नटराजनने डेथ ओव्हरमध्ये टिच्चून केलेल्या गोलंदाजीचे कर्णधार वॉर्नरने टीम मिटिंगमध्ये कौतुक केले. 

या कामगिरीवल नटराजन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी – २० मालिकेसाठी भारतीय संघात नेट बॉरल म्हणून निवडला गेला. त्याच्यासाठी अजून भारतीय संघाचे दार उघडले नव्हते. पण, त्याच्या नशीबाने पुन्हा कलाटनी घेतली, टी – २० संघात निवडला गेलेला केकेआरचा वरुण चक्रवर्ती दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी टी. नटराजनची भारतीय संघात वर्णी लागली. तामिळनाडूच्या या ग्रामीण भागातील टॅलेंटसाठी भारतीय संघाचे दार उघडले गेले. भारताच्या ग्रामीण भागातील या नटरानच्या सक्सेस स्टोरीमुळे अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. नटराजन हा ग्रामीण भारताचा खरा रोल मॉडेल आहे. त्यानं दाखवून दिलयं की तुम्ही काय करता, कोठून येता किंवा तुमच्याकडे सोयी सुविधा आहेत का नाहीत हे मॅटर करत नाही. मॅटर करते ते स्वप्न पाहणे आणि त्यासाठी अपार कष्ट करणे. त्यामुळेच ‘इतनी शिद्दतसे मैंने तुम्हे पाने की कोशिश की हैं, की हर जर्रे ने मुझे तुमसें मिलाने की साजिश की हैं!’ हा शाहरुखचा डायलॉग नटराजनच्या स्टोरीला एकदम चपखल बसतो. 

Back to top button