Cheteshwar Pujara : पुजारासाठी ‘कौंटी’ने उघडले टीम इंडियाचे दरवाजे! | पुढारी

Cheteshwar Pujara : पुजारासाठी ‘कौंटी’ने उघडले टीम इंडियाचे दरवाजे!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या इंग्लंडमध्ये आहे, जिथे तो कौंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स संघाकडून शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत आहे. रविवारी ससेक्स आणि लीसेस्टरशायर यांच्यातील कौंटी सामन्याचा शेवटचा दिवस पार पडला. आयपीएलच्या चकाकीपासून दूर राहत पुजाराने कौंटीमध्ये चार शतके झळकावत पुन्हा एकदा सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

पुजाराला (Cheteshwar Pujara) फॉर्ममध्ये नसल्याने भारतीय संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर तो आपला फॉर्म पुन्हा मिळवण्याच्या उद्देशाने कौंटी क्रिकेटकडे वळला आणि आता त्याने आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. पुजाराला ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडच्या जागी ससेक्स कौंटी क्रिकेट क्लबने करारबद्ध केले होते. त्यानंतर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत धावा केल्या. यात दोन द्विशतक आणि दोन शतकांचाही समावेश आहे.

पुजाराने (Cheteshwar Pujara) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दी आतापर्यंत भारतासाठी 95 कसोटी सामन्यांमध्ये 43.87 च्या सरासरीने 6,713 धावा केल्या आहेत. ज्यात 32 अर्धशतके आणि 13 शतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने भारतासाठी 5 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.

भारताला पुढील जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणेला विश्रांती दिली जाऊ शकते. रहाणे सध्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती. यामुळे रहाणे किमान चार आठवडे क्रिकेटपासून दूर राहू शकतो. माजी उपकर्णधार रहाणे आधीच भारतीय संघातून बाहेर आहे. त्याच्याशिवाय चेतेश्वर पुजाराही (Cheteshwar Pujara) टीम इंडियातून बाहेर आहे. मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी या दोघांचा संघात समावेश करण्यात आला नव्हता.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत या दोघांच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला होता. रहाणेला भरपूर अनुभव असल्याने इंग्लंडसारख्या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी त्याचा समावेश करता आला असता, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार आता ते शक्य नसल्याची चर्चा आहे. भारतीय संघाला जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर कसोटी सामना खेळायचा आहे. याशिवाय तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 मालिकाही खेळायची आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ जूनमध्ये आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे. भारतीय संघ 16 जूनला इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. रहाणे आगामी सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग असणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार दुखापतीतून सावरण्यासाठी रहाणे बंगळूर येथील नॅशनल क्रिकेट अकादमीत जाणार असून तेथे चार आठवडे घालवणार आहे. आयपीएलच्या या मोसमात रहाणेने सात सामन्यांत केवळ 133 धावा केल्या आहेत. रहाणेची गैरहजेरी निवडकर्त्यांना फारशी डोकेदुखी होणार नाही, असेही बोलले जात आहे.

आयपीएलनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती दोन संघांची निवड करू शकते. एक संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल आणि दुसरा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळेल. गतवर्षी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेल्यावर नेमकं असेच घडले होते. त्यावेळी श्रीलंका दौऱ्यासाठी वेगळा संघ आणि इंग्लंड दौऱ्यासाठी वेगळा संघ तयार करण्यात आला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, केएल राहुल, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि फॉर्मात असलेल्या चेतेश्वर पुजारा यांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड केली जाऊ शकते. पुजाराने कौंटी चॅम्पियनशिपमध्ये दोन द्विशतके आणि दोन शतके झळकावली आहेत. पुजाराने कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 स्पर्धेत पाच सामन्यांच्या आठ डावांमध्ये 120.00 च्या सरासरीने 720 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत निवड समिती त्याला इंग्लंदविरुद्धच्या एकमेव कसोटीत संधी मिळू शकते. याशिवाय कोहली-राहुल इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळताना दिसतील.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात टी-20 मालिका 9 जूनपासून सुरू होणार असून ती 19 जूनपर्यंत खेळवली जाणार आहे. हे सामने दिल्ली, कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळूर येथे खेळवले जाऊ शकतात. या मालिकेसाठी संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे मिश्रण पाहायला मिळेल. संघाची कमान हार्दिक पांड्या किंवा शिखर धवन यांच्याकडे सोपवली जाऊ शकते.

त्याचबरोबर तिलक वर्मा, उमरान मलिक, मोहसीन खान, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान यांना संधी दिली जाऊ शकते. याशिवाय दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वर कुमार यांनाही संघात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. संघ निवडण्यापूर्वी निवड समिती दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या सूर्यकुमार यादवच्या फिटनेसवरही लक्ष ठेवेल. दीपक चहर गंभीर दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर आहे.

या दोन दौऱ्यांसाठी कोचिंग स्टाफची विभागणी केली जाईल की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-20 मायदेशातील मालिका खेळणाऱ्या संघाला 26 आणि 28 जून रोजी होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 मालिकेसाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वरिष्ठ खेळाडू इंग्लंडच्या तयारीत व्यस्त असतील. कसोटी सामन्यापूर्वी सराव सामन्यासाठी बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यातही बोलणी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

Back to top button