पुढारी ऑनलाईन डेस्क : Ind vs SA : भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. झंझावाती गोलंदाज एनरिक नॉर्टजे संघात परतला आहे. दुखापतीमुळे तो काही काळ दक्षिण आफ्रिकेच्या संघाबाहेर होता. त्याचबरोबर युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सचाही संघात समावेश करण्यात आला आहे. स्टब्सने आयपीएलच्या या मोसमातही पदार्पण केले. तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. 'बेबी एबी डिव्हिलियर्स' या नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, 21 वर्षीय उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज स्टब्सने क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) T20 चॅलेंजमध्ये गॅबेट्स वॉरियर्सकडून खेळताना गेल्या हंगामात प्रभावित केले. त्याने सात डावात 48.83 च्या सरासरीने 293 धावा केल्या. यामध्ये 23 षटकारांचा समावेश होता. या दरम्यान स्टब्सचा स्ट्राइक रेट 183.12 होता. (Ind vs SA)
याशिवाय नॉर्टजेचेही संघात पुनरागमन झाले आहे. डिसेंबर 2021 मध्ये तो जखमी झाला होता आणि आता तो चांगली गोलंदाजी करू शकतो, असा निवडकर्त्यांना विश्वास आहे. आयपीएलमध्ये दिल्ली संघाकडून खेळताना त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित केले आहे. याशिवाय रीझा हेंड्रिक्स आणि हेनरिक क्लासेन यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू वेन पारनेलही टी-20 संघात पुनरागमन करत आहे. 2017 नंतर तो प्रथमच T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. (Ind vs SA)
CSA चे निवडकर्त्यांचे समन्वयक व्हिक्टर म्पित्सांग म्हणाले, हा दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे, जो आम्ही बर्याच काळापासून पाहिला नाही. आयपीएलमध्ये खेळाडूंना मिळालेल्या अनुभवाचा अर्थ असा आहे की आमच्याकडे एक संघ आहे जो कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी तयार आहे. तसेच त्याला भारतात खेळण्याचा अनुभव आहे. ट्रिस्टन स्टब्स हा मजेदार खेळाडू आहे आणि आम्हाला त्याची चाचणी घ्यायची आहे. या मालिकेसाठी आम्ही कर्णधार टेंबा बावुमा आणि प्रशिक्षक मार्क बाउचर यांना शुभेच्छा देतो. (Ind vs SA)
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रीटोरी, कागिसो रबाडा, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रुसी व्हॅन डर डुसेन, मार्को यान्सेन.