‘या’ दोन गोलंदाजांना मिळणार टीम इंडियात एन्ट्री, सौरव गांगुलींचे संकेत

‘या’ दोन गोलंदाजांना मिळणार टीम इंडियात एन्ट्री, सौरव गांगुलींचे संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) हे भारतातील तरुण खेळाडूंना त्यांची प्रतिभा आंतरराष्ट्रीय स्टार्ससमोर प्रदर्शित करण्यासाठीचे एक परिपूर्ण व्यासपीठ आहे. आयपीएल 2022 आता अंतिम टप्प्यात आहे. या मोसमात अनेक नवीन खेळाडूंनी आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने लोकांची मने जिंकली आहेत. आयपीएलच्या या हंगामात अशाच काही खेळाडूंनी अशी शानदार कामगिरी केली, ज्यामुळे ते आता भारतीय संघात प्रवेश करू शकतात. अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रमुख सौरव गांगुली यांनी संकेत दिले आहेत की आयपीएलच्या या हंगामात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या दोन वेगवान गोलंदाजांना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते.

एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सौरव गांगुलींनी सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा उल्लेख केला. उमरान मलिक आयपीएल 2022 मध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजी आणि विकेट घेण्याच्या क्षमतेमुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या मोसमात त्याने 12 सामन्यात 22.05 च्या सरासरीने 18 विकेट घेतल्या. उमरानने एका सामन्यात पाच विकेट्सही घेतल्या. तो आता या हंगामात अनकॅप्ड खेळाडूंमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.

गांगुली यांनी आपल्या यादीत राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज कुलदीप सेनचाही उल्लेख केला आहे. कुलदीप सेनने या मोसमात 7 सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये तो खूप प्रभावी ठरला आहे. गांगुली म्हणाले, 'किती गोलंदाज 150 किमी वेगाने गोलंदाजी करू शकतात? जास्त नाही. असे असताना उमरान मलिकची टीम इंडियासाठी निवड झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.'

पण या सर्वांबाबत बोलताना गांगुलींनी सावधगिरीचा सल्ला दिला. ते म्हणाले, 'आपण नव्या दमाचे गोलंदाज वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. उमरान सर्वात वेगवान आहे. मला कुलदीप सेनसुद्धा आवडतो. तसेच टी नटराजनने पुनरागमन केले आहे. आपल्याकडे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी असतील. आमच्या वेगवान गोलंदाजांचा दबदबा पाहून मला खूप आनंद झाला आहे. मात्र, हे सर्व निवडकर्त्यांवर अवलंबून आहे.'

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलींनी मुलाखतीदरम्यान यंदाच्या हंगामातील गोलंदाजांच्या वर्चस्वाबद्दल मत व्यक्त केले. ते म्हणाले, 'गोलंदाजांचे वर्चस्व पाहून मला खूप आनंद झाला आहे. मुंबई आणि पुण्याच्या विकेट खूप चांगल्या आहेत आणि ते चांगला बाऊन्स घेत आहेत. वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त फिरकी गोलंदाजही चांगली गोलंदाजी करत आहेत.'

IPL 2022 संपल्यानंतर द. आफ्रिकेचा संघ भारताच्या दौ-यावर येणार आहे. उभय संघांमध्ये 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका 9 जून ते 19 जून दरम्यान खेळली जाणार आहे. यानंतर, भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाईल. तिथे 26 जून ते 28 जून दरम्यान आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. तर जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाऊन यजमान इंग्लंडविरुद्ध 1 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळायचे आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news