IPL 2022 : नेट रनरेट म्हणजे काय रे भाऊ? ‘प्लेऑफ’ची शर्यत रोमांचक | पुढारी

IPL 2022 : नेट रनरेट म्हणजे काय रे भाऊ? ‘प्लेऑफ’ची शर्यत रोमांचक

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्सचे स्थान निश्चित झाले आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपरजायंट्स हे प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणखी दोन प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आयपीएल प्लेऑफमध्ये नेट रनरेट अनेकदा मोठी भूमिका बजावतो.

सोमवारी दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानंतर ही शर्यत अधिकच रोमांचक झाली आहे. 13 सामन्यांतून 20 गुणांसह प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करणारा गुजरात टायटन्स (GT) हा एकमेव संघ आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांचा प्रवास संपुष्टात आला आहे. या तिघांशिवाय बाकीचे संघ नेट रनरेट आणि जर-तरच्या फे-यात अडकले आहेत.

नेट रनरेट कसा मोजला जातो?

नेट रनरेट मोजण्यासाठी एक साधी पद्धत आहे. त्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. आयपीएलमध्येच एखाद्या संघाने 20 षटकांत 180 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 20 षटकांत केवळ 140 धावा दिल्या तर त्यांचा नेट रन रेट 2 असेल. आता हे कसे झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. चला तर जाणून घेऊया. वरील उदाहरणात बॅटींगचा रनरेट 9 असेल कारण संघाने 20 षटकात 180 धावा केल्या आहेत. तर त्या संघाने 20 षटकात 140 धावा दिल्याने त्यांचा बॉलिंग रनरेट 7 असेल. आता बॅटिंग रन रेटमधून बॉलिंगचा रन रेट वजा केला तर नेट रनरेट सहज मिळतो (बॅटिंग रन रेट 9 – बॉलिंग रन रेट 7 = 2).

जर एखादा संघ निर्धारित षटकांपूर्वी ऑलआऊट झाला, तरीही नेट रनरेटचे कॅलक्युलेशन निर्धारित षटकांच्या आधारेचे मोजले जाते. उदाहरणार्थ, RCB संघाचा संघ 18 षटकात 5 च्या धावगतीने 90 धावांवर ऑलआऊट झाली. असे असूनही RCB चा फलंदाजीचा नेट रनरेट 4.50 (90 धावा/20 = 4.50) मानला जाईल. (IPL 2022)

डीएलएस आल्यावर काय होते?

पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास, निव्वळ रन-रेट वास्तविक धावसंख्येऐवजी DLS लागू केल्यानंतर निर्धारित करण्यात आलेली धावसंख्या आणि षटकांच्या आधारे निर्धारित केली जाते. उदाहरणार्थ, जर पंजाब किंग्स संघाने 20 षटकांत 200 धावा केल्या आणि आरसीबीचे लक्ष्य पावसामुळे 16 षटकांत 170 धावांचे झाले, तर 16 षटकांत केलेल्या धावांच्या आधारे नेट रनरेटही निश्चित केला जाईल. (IPL 2022)

प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने पूर्ण षटके खेळली आणि त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवर ऑलआऊट केले, तर त्यांना नेट रनरेटमध्ये पूर्ण षटके खेळण्याचा फायदा मिळू शकतो. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये प्रत्येक सामन्यासह नेट रनरेट वाढत आणि कमी होत राहतो. जर एखाद्या संघाने पहिल्या सामन्यात चांगला खेळ केला आणि दुस-या सामन्यात खराब खेळ केला, तर त्याच्या स्पर्धेतील एकूण नेट रनरेटवर परिणाम होतो.

Back to top button