EURO2020 | पॅट्रिक शिकची भन्नाट 'किक' पाहिली का? | पुढारी

EURO2020 | पॅट्रिक शिकची भन्नाट 'किक' पाहिली का?

ग्लासगो; पुढारी ऑनलाईन :  EURO2020 मध्ये चेक रिपब्लिकने पॅट्रिक शिकच्या दोन गोलच्या जाेरावर स्कॉटलँडचा २-० असा पराभव केला. ग्लासगो हॅम्पडेन पार्क येथे झालेल्या युरो कप २०२० च्या ड गटातील सामन्यात चेक रिपब्लिकने आपला पहिला विजय नोंदवला. या सामन्यात चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक शिकने एक भन्नाट गोल मारला. त्याच्या या डाव्या पायाच्या किकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ज्या अंतरावरुन हा गोल मारला ते पाहता युरो कप इतिहासात हा गोल सर्वात लांबून मारलेल्या गोलमध्ये समाविष्ट होणार हे निश्चित. 

पॅट्रिक शिकने सामन्याचा पहिला हाफ संपण्यापूर्वी काही वेळ आधीच हा भन्नाट गोल दागला. स्कॉटलँडने चेक रिपब्लिकच्या गोलपोस्टवर चढाई केली होती. पण, त्यांनी चेंडूवरचे नियंत्रण गमावले. याचा फायदा घेत पॅट्रिक शिकने चेंडू आपल्या ताब्यात घेत हाफ लाईन पासूनच जोरदार किक मारली. आपल्या डाव्या पायाने मारलेल्या या शॉटने स्कॉटिश गोलपोस्टचा अचून वेध घेतला. यावेळी स्कॉटिश गोलकिपर डेव्हिड मार्शल याने हा अनपेक्षित हल्ला रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले पण, त्याला गोल वाचवता आला नाही. या प्रयत्नात तो गोलपोस्टच्या आतील जाळीवर जाऊन पडला. पण, त्याआधीच चेंडूने गोलचा वेध घेतला होता. 

या गोलमुळे चेक रिपब्लिकने स्कॉटलँडविरुद्धची आघाडी १ गोलने वाढवली. यापूर्वीचा गोलही पॅट्रिक शिकनेच केला होता. त्याने ४२ व्या मिनिटाला हेडद्वारे गोल दागला होता. या सामन्यात स्कॉडलँडने चेक रिपब्लिकच्या गोलपोस्टवर सतत आक्रमण केले. पण, त्यांना याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले. चेक रिपब्लिकचा गोलकिपर टोमास वॅकलिकने उत्तम बचाव करत ही आक्रमणे रोखली. 

 

Back to top button