पी व्‍ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी | पुढारी

पी व्‍ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्‍पिकमध्‍ये भारताची सातव्या दिवशी चांगली सुरुवात झाली. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत भारताची बॅडमिंटनपटू पी व्‍ही सिंधू हिने तिसऱ्या फेरीत विजय मिळवला. पी व्‍ही सिंधू हिने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड हिला २१-१५, २१-१३ अशा सेटमध्ये हरवले. या विजयामुळे पी व्‍ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली.

सिंधूने दुसऱ्या फेरीत हाँगकाँगच्‍या चेंयूग गँन हिचा सलग दोन सेटमध्‍ये पराभव केला होता.

बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू कडून महिला एकेरीत पदकाची अपेक्षा आहे. सिंधू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी एकमात्र भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू आहे.

तिने २०१६ रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवले होते.

रियो ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये तिला पराभूत करणारी स्पेनची कॅरोलिना मारिन ही दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे सिंधूला पदकाचे प्रबळ दावेदार समजले जात आहे.

सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्णपदकासह पाच पदके जिंकली आहेत. २०१३ आणि २०१४ मध्ये तिने कांस्यपदक मिळवले होते.

२०१७ व २०१८ मध्ये रौप्य तर, २०१९ मध्ये तिने सुवर्णपदक मिळवले. सिंधूने २०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला सांघिक गटांत कांस्यपदक मिळवले.

तर, जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले.

दरम्यान, तिरंदाजीमध्ये भारताचा तिरंदाज अतानू दास याने १६ च्या फेरीत दक्षिण कोरियाच्या ओह जीन हायक याचा पराभव केला.
हॉकीमध्ये भारताने अर्जेटिनाला ३-१ गोलने धूळ चारली.

मेरी कोमकडून पदकाची आशा…

टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ४९ वजनी गटात रौप्य पदक मिळवले आहे. आता बॅडमिंटनमध्ये सिंधू आणि बॉक्सर मेरी कोम यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.

मेरी कोमने २०१२ ऑलिम्पिक पदक जिंकले होते. सहा वेळची जागतिक चॅम्पियन असलेली मेरी कोम (५१ किलो) दुसर्‍यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग झाली आहे. यावर्षी मेमध्ये कझाकिस्तानमध्ये आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले होते.

हे ही वाचा :

Back to top button