सिडनी : गेल्यावर्षीपासून जगभर कोरोना महामारीच्या वेगवेगळ्या लाटा येणे सुरूच आहे. आणखी किती काळ हे असेच सुरू राहणार, असा प्रश्न मनात निर्माण होणे साहजिकच आहे.
सध्याही जगभरातील लोकांच्या मनात कोरोनाबाबत जगभरात कधी 'हर्ड इम्युनिटी' म्हणजेच 'सामूहिक रोगप्रतिकारकशक्ती' निर्माण होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी लोकसंख्येच्या किती प्रमाणात लसीकरण आवश्यक आहे, असाही प्रश्न लोकांसमोर पडलेला आहे.
कोरोना प्रतिबंध, लॉकडाऊनपासून कधी सुटका होणार हे जाणून घेण्याची जगभरातील लोकांची इच्छा आहे! त्यासाठी आता वेगवेगळे तज्ज्ञ आपापल्या परीने उत्तरेही देत आहेत.
हर्ड इम्युनिटीसाठी एखादा 'जादूचा आकडा' सांगता येणे कठीण आहे, असेच सध्या काही ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचे मत आहे. सामूहिक प्रतिकारशक्ती अशा वेळी बनते ज्यावेळी बहुसंख्य लोकांमध्ये रोगाविरुद्धच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात.
अशा लोकांमुळे लस न घेतलेले लोकही सुरक्षित राहू शकतात. लसीकरणामुळे असे सुरक्षा कवच मिळत असते. सामूहिक रोगप्रतिकारक शक्तीमुळे एखाद्या रोगाचा फैलाव होणे किंवा त्याची 'महामारी' बनणे रोखले जाते.
हर्ड इम्युनिटीसाठी वेगवेगळ्या रोगांची वेगवेगळी सीमा असते. उदा. गोवर या रोगाची हर्ड इम्युनिटी 92 ते 94 टक्के असते.
कोरोना विषाणूमुळे होणार्या सध्याच्या 'कोव्हिड-19' आजाराबाबत 'हर्ड इम्युनिटी' स्पष्ट करण्यासाठी किती लोकसंख्येमध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होणे आवश्यक आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
त्यासाठी अनेकांनी अनेक प्रकारचे अनुमान लावलेले आहेत. काही तज्ज्ञांनी 85 टक्के लोकसंख्या सुरक्षित झाली की 'हर्ड इम्युनिटी' बनेल असे म्हटलेले आहे. मात्र, असा निश्चित आकडा सध्या सांगणे कठीण आहे.
कोरोनाचे सतत बदलणारे रूप, त्यांच्याशी लढण्यासाठी सध्याच्या लसींची परिणामकारकता आदी अनेक कारणे यामागे आहेत. अद्याप अनेक ठिकाणी लहान मुलांचे लसीकरण सुरू झालेले नाही, हे सुद्धा विचारात घ्यावे लागणार आहे.
प्रत्येक देशाची लोकसंख्या, तेथील स्थिती, लसीकरण आदी अनेक निकषांनुसार 'हर्ड इम्युनिटी'चा आकडा वेगवेगळा असू शकतो. मात्र, भविष्यात कोव्हिडचा धोका कायम राहिला तरी त्याची तीव्रता कमी असेल, असा संशोधकांना भरवसा वाटतो!