जगामध्ये अतिमहावृष्टीचे प्रमाण वाढले, हवामान बदलाचा संबंध? | पुढारी

जगामध्ये अतिमहावृष्टीचे प्रमाण वाढले, हवामान बदलाचा संबंध?

कोल्हापूर ; सुरेश पवार : कोल्हापूरच्या पर्जन्यमानाच्या इतिहासात 22 आणि 23 जुलै या दोन दिवसांची ‘ब्लॅक डेज’ म्हणून नोंद होईल, यात शंका नाही. या दोन दिवसांत तीनशे मिलिमीटर म्हणजे सुमारे बारा इंच पाऊस कोसळला. कोल्हापूरला महापुराचा वेढा बसला. धरण क्षेत्रापेक्षा अन्य क्षेत्रात फ्री कॅचमेंट एरियात महावृष्टी झाल्याने ही आपत्ती ओढवली, असे अधिकृत सूत्रांचे अनुमान आहे.

काहीही कारण असले तरी महावृष्टी झाली, अभूतपूर्व महापुराचे संकट आले, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 115 वर्षांत जगात अतिमहावृष्टीच्या 14 घटनांची नोंद आहे. त्यातील सहा दुर्घटना या गेल्या 15 वर्षांतील आहेत. म्हणजेच अतिमहावृष्टीचे प्रमाण वाढत चालले आहे.

त्यामुळे अतिमहावृष्टीमागे हवामान बदलाचा काय संबंध आहे, याचे संशोधन करण्याचे आव्हान उभे आहे. त्याबरोबर अशा अभूतपूर्व महाआपत्तीला तोंड देण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्थेचे शिवधनुष्य पेलण्याची ही जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारला उचलावी लागणार आहे.

कोल्हापूर शहर-जिल्ह्याला गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस झालेल्या जलतांडवाने महापुराची अस्मानी आपत्ती कोसळली. पंचगंगा नदीची धोक्याची पातळी पाहता पाहता ओलांडली गेली आणि ती 56 फूट 3 इंचांवर गेली.

2019 मध्ये आलेल्या महापुरावेळी ही पातळी 55 फूट 6 इंच होती. पंचगंगा नदीच्या पातळीने 2019 चे रेकॉर्ड मोडले. अवघ्या दोन दिवसांच्या धुवाँधार पावसाने कोल्हापुरात हाहाकार माजला. असाच जलप्रलय सांगलीत उद्भवला. निम्मे सांगली शहर जलमय झाले.

सातारा जिल्ह्यात कराड-पाटण भागात पर्जन्याच्या रौद्र स्वरूपाचा तडाखा बसला. दरडी कोसळून 84 बळी गेले. कोकणात चिपळूणसह अनेक भागात जणू आभाळच कोसळले. महाराष्ट्रात एकूण नऊ जिल्ह्यांत पर्जन्य प्रकोपाने वाताहात झाली.

पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात यावर्षी जो हाहाकार उडाला, त्याहून अधिक गंभीर परिस्थिती जगाच्या वेगवेगळ्या भागात ढगफुटीने उद्भवली आहे.

गेल्या 115 वर्षांत जगातील 14 ठिकाणी निसर्गाने आपले महाभीषण विनाशकारी स्वरूप प्रकट केले आहे. या चौदापैकी पाच ठिकाणे आहेत, ती आपल्या भारतातील आहेत. त्यातही महाराष्ट्रातील तीन आहेत. महाराष्ट्रात मुंबईला एकदा ही अस्मानी आपत्ती ओढवली, तर पुणे जिल्ह्यात त्याचा दोन वेळा दणका बसला.

मुंबई-पुण्यात 26 जुलै 2005 आणि 29 सप्टेंबर व 4 ऑक्टोबर 2010 असे तीन दिवस पावसाने थैमान घातले. भारतात आणखी दोन ठिकाणी जी महावृष्टी झाली, त्याची जागतिक महावृष्टीच्या 14 दिवसांत नोंद झाली आहे.

5 ऑगस्ट 2010 रोजी लेह (लडाख) येथे अवघ्या तासाभरात 250 मि.मी. म्हणजे 9.84 इंच एवढी महापर्जन्यवृष्टी झाली, तर 1 जुलै 2016 रोजी उत्तराखंड येथे पिठोरगढ भागात दोन तासांत 100 मि.मी. म्हणजे सुमारे चार इंच पावसाने प्रलय ओढवला. महावृष्टीच्या 14 दिवसांपैकी पाच दिवस भारतातील आहेत.

होत्याचे नव्हते झाले

26 नोव्हेंबर 1970! फ्रान्समधील ग्वादेलूप हे ठिकाण. येथे या दिवशी अवघ्या एक मिनिटात 38.10 मि.मी. म्हणजे दीड इंच पाऊस पडला. ही सर्वात उच्चांकी महापर्जन्यवृष्टी. 29 नोव्हेंबर 1911 रोजी पनामा येथे साडेपाच मिनिटात 61.72 मि.मी. (सुमारे अडीच इंच), 12 मे 1916 रोजी जमैकात 15 मिनिटांत सुमारे 200 मि.मी. (सुमारे 8 इंच), 7 जुलै 1947 रोजी रोमानियात 20 मिनिटांत 205.74 मि.मी. (8.1 इंच), 24 ऑगस्ट 1906 रोजी अमेरिकेत व्हर्जिनियात 40 मिनिटांत सुमारे 235 मि.मी. (9.25 इंच) अशी महावृष्टी झाली आणि काही मिनिटांतच होत्याचे नव्हते झाले.

2 एप्रिल 2013 रोजी अर्जेंटिनात 5 तासांत 390 मि.मी. (15.35 इंच), 8 जानेवारी 1966 रोजी फ्रान्समध्ये 13 तासांत 1,144 मि.मी. (45.03 इंच), त्याच दिवशी भारत-बांगला देश सीमेवर 20 तासांत 2,329 मि.मी. (91.69 इंच) आणि 1952 च्या मार्चमध्ये फ्रान्समध्ये 24 तासांत 1,870 मि.मी. (73.62 इंच) अशी महामुसळधार वृष्टी झाली.

नवे आव्हान

गेल्या 115 वर्षांतील महावृष्टीच्या या ठळक नोंदी. अवघ्या काही मिनिटांत, काही तासांतच अचानक कोसळणार्‍या या अस्मानी आपत्तीने पर्जन्यवृष्टीच्या अभ्यासाला नवे वळण मिळाले आहे. एका तासात 100 मि.मी. म्हणजे सुमारे 4 इंच पाऊस झाला, की ढगफुटी होते, अशी एक व्याख्या आहे.

115 वर्षांतील 14 महावृष्टींपैकी गेल्या 15 वर्षांत सहा महावृष्टी झाल्या आहेत. म्हणजे ढगफुटीच्या आपत्तीचे प्रमाण वाढत चालले आहे. या नव्या संकटाची कारणमीमांसा करण्याबरोबर त्याला तोंड द्यायचे आव्हान आता समोर आले आहे.

मुंबई-पुण्यातील तीन ‘ब्लॅक डेज’

मुंबईवर 26 जुलै 2005 रोजी अक्षरशः आभाळ कोसळले. केवळ दहा तासांत 1,448 मिलिमीटर म्हणजे तब्बल 57 इंच पाऊस कोसळला. कोल्हापूरला सरासरी 35 ते 40 इंच पाऊस पडतो. त्या तुलनेत मुंबईत 26 जुलैला 10 तासांत कोल्हापूरच्या दीड पटीहून अधिक पर्जन्यवृष्टी झाली. 2010 सालात पुणे जिल्ह्यात दोनदा आभाळ फाटले.

29 सप्टेंबर 2010 रोजी पुण्यातील खडकवासला आदी भागात अवघ्या एका तासात 144 मिलिमीटर म्हणजे 5.67 इंच पाऊस कोसळला, तर आणखी पाचच दिवसांनी 4 ऑक्टोबर 2010 रोजी पुण्यावर पुन्हा पर्जन्यप्रकोप झाला. पुण्याच्या पाषाण आदी भागात 4 ऑक्टोबरला अवघ्या दीडच तासात 182 मिलिमीटर म्हणजे 7.15 इंच एवढा पाऊस पडला.

पुण्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान आहे 1,200 मिलिमीटर! म्हणजे या दोन दिवसांतच पुण्यात पर्जन्यकाळात पडणार्‍या एकूण पावसाच्या तुलनेत 12 ते 15 टक्के पाऊस पडला.

मुंबई-पुण्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी हे महावृष्टीचे तीन दिवस ‘ब्लॅक डेज’ ठरले आणि जगाच्या 115 वर्षांच्या महावृष्टीच्या इतिहासातील चौदा दिवसांत या तीन दिवसांची नोंद झाली.

Back to top button