Sri Lanka vs India 2nd T20 : लंंकेचा रोमहर्षक विजय, मालिका बरोबरीत

कोलंबो : पुढारी ऑनलाईन

भारत विरुद्ध श्रीलंका ( Sri Lanka vs India 2nd T20 ) दुसरा टी२० सामना श्रीलंकेने ४ विकेट्सनी जिंकत मालिका १ – १ अशी बरोबरीत आणली. या सामन्यात भारताला आपल्या संघात मोठा बदल करावा लागला होता. जवळपास भारताची तिसरी टीम या सामन्यात खेळली. पण, त्यांनीही लंकेला शेवच्या षटकापर्यंत झुंजवले.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत भारताला १३२ धावात रोखले. भारताकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ४० धावा केल्या. तर लंकेकडून अकिला धनंजयाने भेदक मारा करत २ विकेट घेतल्या. भारताचे १३३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लंकेला भारतीय युवा गोलंदाजांनी चांगलाच घाम फोडला. अखेर धनंजय डि सिल्वाने नाबाद ४० धावांची झुंजार खेळी करत सामना श्रीलंकेकडे झुकवला. भारताकडून कुलदीप यादवने ३० धावात २ बळी घेतले.

श्रीलंकेची खराब सुरुवात

भारताने ठेवलेल्या १३३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण, भुवनेश्वर कुमारने आक्रमक अविष्का फर्नांडोला बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. फर्नांडो बाद झाल्यानंतर समरविक्रमा आणि मिनोद भानुका यांनी डाव सावरत लंकेला ६ षटकात ३६ धावांपर्यंत पोहचवले.

मात्र त्यानंतर वरुण चक्रवर्तीने ८ धावांवर खेळणाऱ्या समरविक्रमाला बाद करत ही जोडी फोडली. समरविक्रमा बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार दसुन शनकाला फारसे काही करता आले नाही. तो ३ धावांची भर घालून माघारी परतला. त्याला कुलदीप यादवने बाद केले.

खराब सुरुवात करणाऱ्या लंकेने १० षटकात ३ बाद ५८ धावांपर्यंत मजल मारली होती. मिनोद भानुका एका बाजूने किल्ला लढवत होता. त्याला भुवनेश्वर कुमारने ३४ धावांवर जीवनदान दिले. पण, त्याच षटकात कुलदीप यादवने त्याला चेतन साकरिया करवी ३६ धावांवर बाद करत लंकेला चौथा आणि मोठा धक्का दिला.

धनंजय डि सिल्वाची झुंजार खेळी ( Sri Lanka vs India 2nd T20 )

लंकेचे चार फलंदाज माघारी गेल्यानंतर धनंजय डि सिल्वा आणि हसरंगा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लंकेची मंद धावगती वाढवण्यासाठी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी १५ व्या षटकापर्यंत लंकेला शंभरीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.

पण, राहुल चाहरने हसरंगाला १५ धावांवर बाद करत लंकेला पाचवा धक्का दिला. सामना बॉल टू रन असा आला असताना भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चेंडू आणि धावा यातील अंतर वाढू लागले. याच दबावात रमेश मेंडीस २ धावांवर बाद झाला.

पण, धनंजय डि सिल्वाने एकाकी झुंज देण्यास सुरुवात केली. त्यातच पावसाची एक सर बरसली आणि खेळ पाण्यात जाणार का असे वाटले. मात्र पाऊस लगेचच बंद झाल्याने सामना थांबला नाही. दरम्यान १९ वे षटक टाकणाऱ्या अनुभवी भुवनेश्वर कुमारला करुणानरत्नेने षटकार मारत दबावात आणले. भुवनेश्वरने टाकलेल्या या षटकात श्रीलंकेने १२ धावा वसूल केल्या.

करुणारत्नेने शेवट केला गोड

आता लंकेला शेवटच्या षटकात विजयसाठी ८ धावांची गरज होती. अखेरचे षटक टाकण्यासाठी साकरियाला पाचारण करण्यात आले. त्याने पहिल्या चेंडूवर १ धाव दिली आणि धनंजयला स्ट्राईकवरुन बाजूला केले. त्यानंतर दुसरा चेंडू त्याने वाईड टाकला आणि एक धावही गेली. त्यामुळे आता ५ चेंडूत ५ धावा असे इक्वेशन आले. पाचव्या चेंडूवर करुणारत्नेने दोन धावा घेत सामना आवाक्यात आणला.

त्यानंतर चौथ्या चेंडूवर पुन्हा दोन धावा घेतल्या त्यामुळे सामना बरोबरीत आला. आता लंकेला ३ चेंडूत विजयासाठी १ धावेची गरज होती. करुणारत्नेने ती विजयी धाव पूर्ण करत सामना जिंकला आणि मालिकेतील आव्हान कायम ठेवले.

आश्वासक सुरुवातीनंतर भारत ढेपाळला

भारत विरुद्ध श्रीलंका ( Sri Lanka vs India 2nd T20 ) दुसरा टी२० सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर १३३ धावांचे आव्हान ठेवले. फिरकीला पोषक खेळपट्टीवर भारताने प्रथम फलंदाजी करताना आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांनी पॉवर प्लेमध्ये ४५ धावांपर्यंत मजल मारली. शिखर आणि ऋतुराज दोघांनीही संधी मिळताच मोठे फटके खेळत धावगती चांगली ठेवली.

हे दोघे भारताचे अर्धशतक धावफलकावर लावणार इतक्यात कर्णधार शनकाने ऋतुराज गायकवाडला २१ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर शिखर धवन आणि देवदत्त पडिक्कल यांनी भारताचा डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. पण धनंजयाने ४० धावा करणाऱ्या शिखर धवनचा त्रिफळा उडवत भारताला दुसरा धक्का दिला.

 मधल्या फळीकडून निराशा ( Sri Lanka vs India 2nd T20 )

त्यानंतर पडिक्कल आणि संजू सॅमसन यांनी भारताला शतकाजवळ पोहचवले. मात्र धावगती मंदावल्याने पडिक्कलने आक्रमक फटके मारण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २३ चेंडूत २९ धावा केल्या. पडिक्कल बाद झाल्यानंतर संथ फलंदाजी करणारा संजू सॅमसनही धनंजयाचा गोलंदाजीवर ७ धावांवर बाद झाला.

सॅमसन बाद झाला त्यावेळी १७ वे षटक सुरु होते. त्यानंतर नितीश राणा आणि भुवनेश्वर कुमारने उरलेल्या षटकात झपाट्याने धावा करण्याचा प्रयत्न केला. पण, अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात नितीश राणा १२ चेंडूत ९ धावा करुन बाद झाला. अखेर भारताला डाव २० षटकात ५ बाद १३२ धावांपर्यंतच मजल मारता आली.

श्रीलंकेकडून अकिला धनंजयाने चांगाला मारा करत ४ षटकात २९ धावा देत २ बळी टिपले. तर हसरंगा, चमिरा, शनका यांनी प्रत्येकी १ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.

हेही वाचले का: 

पाहा व्हिडिओ : ब्राझीलचं सीताफळ पिकणार मुंबईच्या टेरेसवर

Back to top button