Ravi Bishnoi : रवी बिश्नोई कोण आहे? जो पहिल्या टी-२० सामन्यात बनला सामनावीर! | पुढारी

Ravi Bishnoi : रवी बिश्नोई कोण आहे? जो पहिल्या टी-२० सामन्यात बनला सामनावीर!

पुढारी ऑनलाईन डेस्क 

Ravi Bishnoi : विडींज विरूध्दची एकदिवसीय मालिका भारताने एकतर्फी जिंकली. या मालिकेत भारताने विडींजचा ३-० ने पराभव केला होता, हीच विजयी पताका अखंडित ठेवून भारताने विडींज विरूध्दच्या टी-२० मालिकेची सुरूवात विजयी धडक्याने केली आहे. भारताने पहिल्या टी-२० सामन्यात विंडीजचा ६ गडी राखून पराभव केला.  या सामन्यातून टीम इंडियामध्ये पदार्पण करणाऱ्या लेगस्पिनर रवी बिश्नोईने २ बळी घेतले आणि पदार्पणाच्या सामन्यातच तो सामनावीर ठरला.

काल झालेल्या टी-२० सामन्यात पदार्पण करणाऱ्या रवी बिश्नोईने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला जोरदार सुरूवात केली आहे. त्याने विडींज विरूध्द झालेल्या सामन्यात त्याने ४ षटकांत १७ धावा देत विडींजच्या दोन फलंदाजांना आपल्या जाळ्यात लिलया अडकवले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर ठरणांऱ्याच्या खास खेळाडूंच्या यादीत तो सामील झाला आहे. पहिल्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजने प्रथम खेळताना ७ गडी गमावत १५७ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने १८.५ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ४० धावा केल्या. अशा प्रकारे संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे.

२१ वर्षीय युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईसाठी क्रिकेट विश्वातील प्रवास सोपा नव्हता. राजस्थानमधील जोधपूरच्या गोलंदाजाने शेतात क्रिकेट पीच तयार करून तिथे सराव केला. त्यानंतर त्याने आपले मित्र आणि प्रशिक्षकांसोबत मिळून अॅकॅडमी सुरू केली. अॅकॅडमीची उभारणी करताना त्याने स्वत: मजूरासारखे काम केले, या दरम्यान तो सतत मेहनत करत राहिला.

अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत त्याने आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यावेळी २०२० च्या फायनलमध्ये भारतीय संघ बांगला देशकडून पराभूत झाला असला तरी ६ सामन्यांत १७ विकेट घेत त्याने स्वतःला सिद्ध केले. पहिला टी-20 सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही सामनावीर बिश्नोईचे जोरदार कौतुक केले.

टी-२० क्रिकेटमध्ये चांगले रेकॉर्ड

अंडर-१९ विश्वचषकातील चमकदार कामगिरीमुळे रवीला आयपीएलमध्येही खेळण्याची संधी मिळाली. २०२० मध्ये त्याने पहिल्यांदा टी-२० आयपीएलमध्ये प्रवेश केला. २०२० आणि २०२१ या दोन्ही हंगामात तो पंजाब किंग्जकडून खेळला होता. त्याने पंजाबसाठी २३ सामन्यात २४ विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनमी ७ पेक्षा कमी आहे. यावरून त्याच्या तिखट गोलंदाजीचा अंदाज लावता येतो. २४ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएल २०२२ साठी त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 4 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघ प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी झाला आहे.

Back to top button