नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सेवानिवृत्त नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा डॉ. अमित यांचा खून केल्यानंतर संशयित आरोपी राहुल गौतम जगताप हा नानासाहेब कापडणीस यांचा मोबाइल वापरत होता. मोबाइलचा वापर करून त्याने अनेक आर्थिक व्यवहार केले. मात्र, जानेवारी महिन्यात शीतल कापडणीस यांनी त्यांचे वडील नानासाहेब यांच्या मोबाइलवर फोन केला आणि राहुलचा डाव फसला. त्यानंतर त्याने अनेक पळवाटा शोधल्या मात्र पोलिसांच्या तपासात त्याचे बिंग फुटले व तो गजाआड झाला.
डिसेंबर 2021 मध्ये राहुल याने नानासाहेब व डॉ. अमित कापडणीस यांचा खून केल्यानंतर नानासाहेब यांच्या मोबाइलचा वापर सुरू केला. नानासाहेब यांच्या डिमॅट खात्यातून राहुलने 97 लाख रुपयांचे शेअर्स विक्री करून ते पैसे आरटीजीएस व चेकमार्फत दुसर्याच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर सावरकरनगर परिसरात नानासाहेब हे तीन मजली बंगला बांधत होते. त्या बंगल्याचे काम थांबू नये यासाठी त्याने बांधकामासाठी लागणारा पैसाही पुरवला. नानासाहेब यांच्या मोबाइलवर फोन आल्यास राहुल ते फोन उचलून स्वत: नानासाहेब बोलत असल्याचे भासवत होता.
दरम्यान, मुंबईला असणार्या शीतल यांनी 16 जानेवारीला त्यांचा भाऊ अमितला फोन केला. मात्र, त्याने फोन न उचलल्याने त्यांनी 18 जानेवारीला वडील नानासाहेब यांना फोन केला. त्यावेळी राहुलने फोन उचलला. शीतल यांनी वडिलांची चौकशी केली असता राहुलला समर्पक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे शीतल नाशिकला आल्या. राहुलची भेट घेत त्यांनी वडिलांबाबत चौकशी केली. मात्र वडील न मिळाल्याने व त्यांच्या नवीन घराचा पत्ता नसल्याने शीतल पुन्हा मुंबईला गेल्यानंतर त्यानंतर 28 जानेवारीला त्या पुन्हा नाशिकला आल्या व वडील आणि भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर दुहेरी खुनाचा प्रकार उघडकीस आला.
राहुलने पुरावे नष्ट करण्यासाठी जेवढे सापळे रचले त्या सापळ्यांमध्येच राहुल फसत गेल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने राहुलला 25 फेबु्रवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोण आहे राहुल जगताप
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत राहुल हा 2011 पर्यंत परदेशात होता. त्यानंतर त्याने शहरात येऊन हॉटेल व कापड विक्री व्यवसायात पाऊल टाकले. त्याचप्रमाणे त्याला शेअर मार्केटचे ज्ञान असल्याने त्याबाबत त्याने काही वर्कशॉप घेतल्याचेही समोर येत आहे.
मोबाइलवरून व्यवहार
राहुलने नानासाहेब यांच्या मोबाइलवरून सर्व आर्थिक व्यवहार केले. बंगल्याचे काम थांबू नये यासाठी त्याने ऑनलाइन पद्धतीने सर्व पैसे दिले. त्याचप्रमाणे शेअर्स विक्री केले. नानासाहेब यांनी गाळा घेतला होता त्याचेही पैसे राहुलने दिले. नाशिक महानगरपालिकेने नानासाहेब यांना नोटीस बजावून बंगल्याच्या कामाच्या ठिकाणी पत्रे लावण्यास सांगितले होते. तेदेखील राहुलने बसवले. शेजारच्यांना संशय येऊ नये यासाठी कापडणीस यांच्या फ्लॅटमधील सामान देवळाली कॅम्प येथील रो-हाऊसमध्ये हलवले. खून केल्यानंतर काही दिवसांतच राहुलने रेंज रोव्हर ही आलिशान कारही विकत घेतली.
पुरावे नष्ट करण्याचे सत्र
जिल्ह्यात घडलेल्या खुनांच्या गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपींकडून खून केल्यानंतर मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांचाही मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : नानासाहेब व अमित यांचा शोध सुरू झाल्याने राहुलने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पैशांसाठी अमितने नानासाहेब यांचे बरेवाईट केले असे भासवण्यासाठी राहुलने नानासाहेब यांच्या बँक खात्यातून अमितच्या बँक खात्यात 40 लाख रुपये वर्ग केल्याचे समोर आले आहे. मात्र, राहुलचा हा डाव फसला.
मालमत्ता हडपण्याचा डाव
कापडणीस कुटुंबीयांची कोणी चौकशी करत नाही, त्यांचे नातेवाईक येणार नाही असा विश्वास वाटल्याने राहुलने त्यांची मालमत्ता हडप करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे पोलिस तपासात समोर आले. कापडणीस यांच्या सुमारे 50 लाख रुपयांच्या मुदतठेवी तो घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी वेळीच ती खाती गोठवली. नानासाहेब कापडणीस यांच्याऐवजी तोतया व्यक्ती उभ्या करून स्थावर मालमत्तांचा व्यवहार करण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याद़ृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.