

बामणोली : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून व खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून आणि युनायटेड स्पोर्टस् अॅन्ड अॅडव्हेंचर मुंबई यांच्या सहकार्याने दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे जागतिक जंगल मॅरेथॉन 2022 स्पर्धेचे आयोजन दि. 19 व 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आल्याची माहिती विकास मोरे यांनी दिली.
ही स्पर्धा पूर्णपणे जंगलातून होणार असून, या स्पर्धेमध्ये कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान, गुजरात राज्यातील तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, साऊथ आफ्रिका येथून एकूण 400 स्पर्धक सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 75 कि. मी., 100 कि मी, 42 कि. मी., 50 कि. मी., 5 कि. मी., 10 कि. मी., 21 कि. मी. अंतराची होणार आहे.
75 कि. मी. व 100 कि. मी. अशा अंतराच्या स्पर्धा होणार आहेत. स. 8.30 वाजता खरोशी येथून स्पर्धेला सुरुवात होईल. खरोशी, घोणसपूर, चतुरबेट, मांघर, बिरवाडी, मेटतळे, हातलोट परत घोणसपूर, झाडाणी, दोडाणी, उतेश्वर मंदिर, गाढवली, शेवट दरे तर्फ तांब.
20 फेब्रुवारी रोजी 42 कि. मी. व 50 कि .मी. अंतराची स्पर्धा दरे येथून पहाटे 3 वा. सुरु होईल. दरे तर्फ तांब, उतेश्वर मंदिर, दोडाणी, झाडाणी, घोणसपूर, खरोशी असा या स्पर्धेचा मार्ग आहे. 5 कि. मी. अंतराची स्पर्धा स. 6.30 वा. सुरु होईल. दरे तर्फ तांब, गाढवली, उतेश्वर मंदिर परत दरे. याच दिवशी 10 कि. मी. अंतराची स्पर्धा दरे तर्फ तांब, गाढवली ते उतेश्वर मंदिर अशी होणार आहे.
या स्पर्धेमध्ये अनुक्रमे 18 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 वर्षे व त्यावरील स्पर्धक सहभागी होणार आहेत.
विविध वयोगटांत ही स्पर्धा होत असून, अनेकांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. या स्पर्धेमध्ये परदेशातून सहभागी होेणार्या स्पर्धकांविषयी नागरिकांना उत्सुकता लागली असून, जंगल मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच ही स्पर्धा पाहणेही रोमांचक ठरणार आहे.
रात्री बोटीच्या सहाय्याने तापोळा, बामणोली भागात राहिलेले स्पर्धक दरे येथे पोहोचणार आहेत. त्यामुळे रात्रीचा बोटिंगचा थरारही स्पर्धकांना अनुभवता येणार आहे. जंगल तसेच दुर्गम भागातून ही मॅरेथॉन स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेचे आकर्षण परिसरातील नागरिक तसेच स्पर्धकांनाही आहे.
हे ही वाचलं का