हिरवा निसर्ग हा भवतीने... जीवन सफर करा मस्तीने | पुढारी

हिरवा निसर्ग हा भवतीने... जीवन सफर करा मस्तीने

भिलार : मुकुंद शिंदे

हिरवा निसर्ग हा भवतीने, 

जीवन सफर करा मस्तीने…

मन सरगम छेडा रे,

जीवनाचे गीत गा रे, 

गीत गा रे धुंद व्हा रे…!

असेच काही वातावरण महाबळेश्वर, पाचगणी परिसरात पाहायला मिळत आहे. निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण, आकाशाशी स्पर्धा करणारे मोठाले वृक्ष, झोेका घेऊन अंगावर रोमांच उभा करणारा खट्याळ वारा, हिरवा शालू परिधान करून पावसाच्या वर्षावाने चिंब चिंब भिजणारा निसर्ग असे विहंगम द़ृश्य महाबळेश्वर-पाचगणी परिसरात  असून मृग नक्षत्रातच हे रुपडे खुलले आहे. कोरोनामुळे पर्यटनाला बंदी असली तरी येथील निसर्ग बहरायचा थोडाच थांबणार आहे. त्याने त्याचे काम सुरू केले आहे.  

गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर-पाचगणी परिसरात संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे येथील पावसाचे न्यारे रूप पाहावयास मिळत आहे. धुक्याची शाल पांघरलेली, सतत होणारी पर्जन्यवृष्टी, या सर्वांचा मनमुराद आनंद लुटणारी सळसळती तरुणाई चिंब – चिंब होऊन बागडताना पाचगणी परिसरात पाहावयास मिळत  आहे.

जून महिना सुरू झाला की पाऊस सुरू होतो आणि येथील निसर्ग बहरू लागतो. यंदा मृगाच्या सुरुवातीलाच  पावसाने दमदार हजेरी लावली असून येथील डोंगररांगा  संततधार पावसामुळे आता हिरवळू लागल्या आहेत. सर्व परिसरात हिरवा गालिचा पसरू लागला आहे. येथील वाराही सुसाट वेगाने मदमस्त बेधुंदपणे वाहू लागला आहे. डोंगरपर्वतांवर धुक्याची शाल पसरली असून हा परिसर तरुणांबरोबरच निसर्गप्रेमींना खुणावत आहे. पावसाने जोर धरला असून पाचगणी परिसरात मेटगुताडजवळील लिंगमळा धबधबा, भिलार वॉटरफॉल याठिकाणचा धबधबा ओसंडून वाहत आहे. येथील सिडने पॉईंट, टेबल लॅन्ड आणि पारसी पॉईंटवरून निसर्गाच्या जादुई कुंचल्याची किमया टिपताना धोम धरणाचे विहंमग रूप  पाहण्याची मजा काही औरच असते. आंबेनळी घाटातही उंचावरून कोसळणारे धबधबे  खुणावू लागले आहेत. येथील ऑन हिल्सवरून हातगेघर, ता. जावली या जलाशयाचे द़ृश्य आनंद द्विगुणीत करणारे आहेे. 

कोरोना नसता तर….

महाबळेश्वर-पाचगणी परिसर दोन दिवसातच चिंब भिजून गेला आहे. आता कोरोना नसता तर ही ठिकाणे पर्यटकांनी बहरून गेली असती. तरुणाई तर काही ना काही निमित्त काढून येथे येऊन मनसोक्तपणे निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत असते. आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे तर त्यांना सोन्याहून पिवळे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच हा परिसर बहरून गेला आहे. 

Back to top button