पुढारी आरोग्य संवाद : अत्यंत गरजेवेळीच‘एचआरसीटी’ करा | पुढारी

पुढारी आरोग्य संवाद : अत्यंत गरजेवेळीच‘एचआरसीटी’ करा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाकाळात भारतात आरटीपीसीआर आणि एचआरसीटी या दोन चाचण्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये आरटीपीसीआर हीच चाचणी योग्य आहे. एचआरसीटीमुळे 100 टक्के निदान होऊच शकत नाही. यातून उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितले आणि आवश्यकता असेल, तरच एचआरसीटी चाचणी करावी, असे स्पष्ट मत लंडनमध्ये क्वीन्स हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करणारे डॉ. प्रवीण घाडगे यांनी व्यक्त केले.

दै. ‘पुढारी’तर्फे आयोजित ‘आरोग्य संवाद’ या विशेष व्याख्यानमालेत ‘कोरोना निदान आणि उपचारांमध्ये रेडिओलॉजीचा वापर’ या विषयावर डॉ. घाडगे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दै. ‘पुढारी’च्या वाचकांशी संवाद साधला.

व्याख्यानमालेच्या आयोजनासंदर्भात माहिती देताना दै. ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोनाचे संकट उभे राहिले आणि बघता बघता संपूर्ण जगालाच त्याने ग्रासले आणि जग पूर्णत: विस्कळीत झाले. अजूनही आपण त्या विळख्यातून बाहेर पडलो नाही. भारतात दुसर्‍या लाटेवर मात करण्याच्या परिस्थितीत आपण आहोत. पाश्चात्त्य देशांत तिसरी लाट येऊन गेली आहे, तर ऑस्ट्रेलियासह अन्य देशांत नव्याने निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. आपल्याकडे तर डेल्टा प्लस व्हेरियंट आला आहे. यातून पुढे काय होईल, हे चित्र अद्यापही स्पष्ट नाही. कोरोना ज्यावेळी नवीन आला होता, त्या वेळी आपल्याकडे कोरोना आजार नेमका काय आणि त्यावर काय उपचार करावेत, याबद्दल काहीच माहीत नव्हते. त्यामुळे लोकांना जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांकडून नव्या आजाराची माहिती व्हावी यासाठी गेल्या वर्षापासून व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. गेल्या वर्षी तब्बल दोन लाख लोकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेतला. यावर्षी देखील ही परंपरा पुढे नेत असून, 2 ते 4 जुलै दरम्यान व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आज व्याख्यानाचा पहिलाच दिवस आहे. आपल्याकडे कोरोनाकाळात आरटीपीसीआर आणि एचआरसीटी या दोन चाचण्यांना अतिशय महत्त्व आले. यामध्ये आरटीपीसीआर ही गोल्डन टेस्ट होतीच. परंतु; एचआरसीटी चाचणीला देखील महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे ही चाचणी करावी का किंवा या चाचणीचे नेमके दुष्परिणाम काय आणि कोरोनामध्ये रेडिओलॉजीचे नेमके महत्त्व काय, याविषयी थेट लंडनहून डॉ. प्रवीण घाडगे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

डॉ. प्रवीण घाडगे म्हणाले की, यंदा आपल्याकडे आयपीएल झाली नाही. परंतु; माझा एचआरसीटी स्कोअर अमूक आला आहे, मी काय करायला हवे, असे मला फोन यायचे. परंतु; आरटीपीसीआर हीच चाचणी महत्त्वाची आहे. ती एकदा पॉझिटिव्ह आली की संक्रमण झाले आहे, असे समजायचे. या चाचणीतच कोरोनाचा विषाणू आहे की नाही, याची खात्री पटते. कोरोनासंक्रमित 20 टक्के लोकांमध्ये गुंतागुंतीच्या समस्या तयार होतात. यामध्ये काही रुग्णांच्या रक्तात गुठळ्या तयार होतात. केवळ अशाच लोकांसाठी एचआरसीटी करणे गरजेचे आहे. एचआरसीटीचा स्कोअर हा मशिनचा दर्जा, व्यक्ती, टेक्निशियन यावर ठरतो. आणि भारतातील मशिन हे परदेशात वापरून कालबाह्य झालेले असते. ते मशिन आपण वापरतो. त्यामुळे स्कोअरच्या विश्वासार्हतेबाबत खात्री देता येत नाही. 8 ते 10 वर्षांच्या मुलाचे किंवा एकाच रुग्णाचे तीन-तीनवेळा सीटी स्कॅन केले गेले. हे अत्यंत दुर्दैवी आहे.  

लंडनमध्ये कोरोनाच्या निदानासाठी एकही एचआरसीटी केली गेली नाही. कोणत्या रुग्णाने हॉस्पिटलमध्ये यायचे आणि कोणी यायचे नाही, याची एक नियमावलीच ठरविली. कोरोनाच्या माध्यमातून जर काही गुंतागुंत तयार झाली, तरच रुग्णालयात दाखल करून घेतले जात आहे. भारतात प्रत्येक जण स्वत:च तज्ज्ञ बनत आहेत. पेशंटने स्वत: डॉक्टर बनण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. एचआरसीटी करायची की नाही, हे डॉक्टरांना ठरवू द्या. एचआरसीटीमुळे 100 टक्के निदान होऊ शकत नाही. एक्स-रे हा देखील एचआरसीटीला चांगला पर्याय आहे. फुप्फुसामध्ये काही गुंतागुंत निर्माण झाली तरच एचआरसीटी टेस्ट करणे गरजेचे आहे. लंडनमध्ये रुग्णाचा ऑक्सिजन कमी झाला, खोकल्याद्वारे किंवा संडासद्वारे रक्त  गेले, सतत ताप आला किंवा चक्कर आली तरच एचआरसीटी तपासणी केली जाते.

कोरोनामध्ये भीती हाच महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळे लोकांना सावध करण्यासाठी राजकीय नेते किंवा सेलिब्रिटींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कारण, लोक सर्वाधिक त्यांचे ऐकतात. कोरोना होऊन गेल्यानंतर फुप्फुसे पुन्हा व्यवस्थित व्हायला किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. जगात म्युकर मायकोसिस केवळ भारतात वाढला. कारण, स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे हा आजार पसरला. कोरोना आणखी किती दिवस राहील हे सांगता येत नाही. त्यामुळे कोरोना झाला तरी लोकांनी घाबरून जाऊ नये. संक्रमित झाल्यास विलगीकरणात जावे. ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरने स्वत:ला तपासत राहावे आणि त्रास वाढल्यानंतर रुग्णालयात जावे. लंडनमध्ये 62 टक्के लोकांचे दोन्ही डोसचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे कोरोनापासून सुटका करण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे असल्याचे देखील डॉ. घाडगे यांनी शेवटी स्पष्ट केले. वेबिनारचे सूत्रसंचालन संतोष आंधळे यांनी केले.  

Back to top button