

Yash Toxic Teaser: रॉकिंग स्टार यश पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. त्याच्या बहुचर्चित आगामी चित्रपट Toxic चा नवा टीझर अखेर प्रदर्शित झाला असून, अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे. यशचा खतरनाक अॅक्शन अवतार, धारदार संवाद आणि रक्तरंजित दृश्यांच्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
टीझरची सुरुवात एका रहस्यमय आवाजाने होते. तो यशच्या पात्राला समजावत म्हणतो “इस बार जंग अलग है. सबसे टकराना भाड़ी पड़ेगा. जिद छोड़ दो राया. इट्स ओवर'' ‘राया’ हेच यशच्या कॅरेक्टरचं नाव आहे. त्यानंतर यशची दमदार एंट्री होते. स्टायलिश लूक, आक्रमकपणा आणि आवाजात आत्मविश्वास, सगळंच अंगावर येणारं.
यानंतर यशचा संवाद येतो “अभी ओवर नहीं हुआ है. जब मैं कहता हूं तब ओवर होता है.” या एका ओळीतूनच त्याचं खतरनाक कॅरेक्टरचं दिसतं. पुढील दृश्यांमध्ये तो शत्रूंवर अक्षरशः तुटून पडताना दिसत आहे.
टीझरच्या शेवटच्या भागात एका नव्या कॅरेक्टरची झलक दाखवण्यात आली आहे. चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी हा व्यक्तीच चित्रपटाचा मुख्य विलन असणार, हे जवळपास निश्चित आहे. ज्या पद्धतीने तो लोकांना निर्दयपणे मारताना दाखवला आहे, त्यावरून यश आणि या रहस्यमय शत्रूमधील संघर्ष जबरदस्त असणार आहे.
हा चित्रपट दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘टॉक्सिक’बाबत जोरदार चर्चा होत आहे. ‘टॉक्सिक’ 19 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याच दिवशी रणवीर सिंगचा Dhurandhar 2 देखील रिलीज होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठा क्लॅश पाहायला मिळणार आहे.
यशच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खास आहे, कारण तब्बल चार वर्षांनंतर तो मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तो शेवटचा KGF Chapter 2 मध्ये दिसला होता. त्यानंतर तो कोणत्याही चित्रपटात झळकलेला नव्हता. आता ‘टॉक्सिक’मधून यश पुन्हा एकदा आपला ‘रॉकिंग स्टार’ अंदाज दाखवणार, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.