

पुढारी ऑनलाईन
द कश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर गिरिजा टिक्कूच्या भाचीने हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची आठवण करून दिली. गेल्या ३२ वर्षांपासून कुटुंबातील कोणीही गिरिजा दीदींचे नाव घेतले नाही आणि या विषयावर कधीही चर्चा झाली नाही. चित्रपट पाहिल्यानंतर प्रथमच आम्ही तिच्याबद्दल बोललो. आम्ही रडलो. अशी प्रतिक्रिया गिरिजा टिक्कूच्या कुटुंबीयांनी दिली.
गिरिजाच्या कुटुंबीयांनी या घटनेबद्दल आपली व्यथा मांडली. विवेक अग्निहोत्रीने एका मुलाखतीत सांगितले की, त्याचे कुटुंब सध्या अमेरिकेत आहे. गिरीजा टिक्कूची भावंडंही चित्रपटाचं प्रदर्शन पाहायला आली होती. विवेक अग्निहोत्री यांनीही त्यांना थांबण्यास सांगितले, मात्र ते थांबले नाहीत. ते निघून गेले. नंतर त्यांनी मेसेज केला की, "गेल्या ३२ वर्षांपासून कुटुंबातील कोणीही गिरिजा दीदींचे नाव घेतले नाही आणि या विषयावर काहीही बोलले नाही. चित्रपट पाहिल्यानंतर प्रथमच आम्ही तिच्याबद्दल बोललो आणि रडलो…"
काश्मीरी पंडितांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. 'द कश्मीर फाईल्स' रिलीज झाल्यानंतर तो देशभरात चर्चेत आला आहे. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची आणि खोऱ्यातून त्यांच्या पलायनाची वेदना, दु:ख चित्रित केल्या आहेत. काश्मिरी हिंदूंवरील क्रूरतेच्या अनेक कहाण्या आहेत. ज्या ऐकून तुमचंही हृदय हेलावून जाईल. अशीच एक कथा आहे गिरिजा कुमारी टिक्कूची.
गिरिजा बारामुल्ला जिल्ह्यातील (सध्या बांदीपोरा जिल्ह्यात) अरिगाम या गावची रहिवासी होती. ती एका शाळेत लॅब असिस्टंट म्हणून काम करायची. ११ जून १९९० रोजी ती पगार घेण्यासाठी शाळेत गेली. पगार घेतल्यानंतर ती त्याच गावातील एका सहकाऱ्याच्या घरी तिला भेटायला गेली. तिच्यावर दहशतवादी नजर ठेवून होते. याच घरातून गिरिजाचे अपहरण झाले होते. गावात राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यासमोर हे अपहरण घडले. दहशतवाद्यांना रोखण्याची हिंमत कोणीच दाखवली नाही.
गिरिजाचे अपहरण केल्यानंतर दहशतवाद्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिचा वेगवेगळ्या प्रकारे छळ करण्यात आला. इतकं करूनही दहशतवाद्यांचे मन भरले नाही, म्हणून त्यांनी इलेक्ट्रिक करवतीचा वापर करून गिरिजाचे दोन तुकडे केले.
दहशतवाद्यांनी इतकी क्रूरता करून संदेश दिला की, काश्मीरला स्वातंत्र्य हवं आहे. गिरिजा टिक्कूसारख्या शिक्षिकेलाही ते धोका मानत होते. गिरिजा टिक्कू यांच्या मागे ६० वर्षांची आई, २६ वर्षांचा पती, ४ वर्षांचा मुलगा आणि २ वर्षांची मुलगी होती. जम्मू-काश्मीरमधील सर्वात लहान भाग असलेल्या काश्मीरमधील या घटनेवर स्थानिक लोकांनी मौन बाळगले. सहन करण्यापलिकडे ते काही करू शकत नव्हते. यामध्ये हजारो काश्मिरी मारले गेले आहेत. केवळ तरुणचं नव्हे तर वृद्ध, लहान मुले आणि महिलाही या संहारात बळी ठरल्या.