द कश्मीर फाइल्स I काश्मीरचे सत्य दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला : पीएम मोदी | पुढारी

द कश्मीर फाइल्स I काश्मीरचे सत्य दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला : पीएम मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीरचं सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला. जे घडलं ते सत्य दाबलं गेलं. ते कधीचं बाहेर आलं नाही. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स चित्रपटाचे कोतुक केले. भाजपच्या संसदीय बैठकीत नरेंद्र मोदींनी ‘द काश्मीर फाइल्स’चा उल्लेख केला. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या देशात खूप चर्चेत आहे. भाजप संसदीय बैठकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी या चित्रपटाचे कौतुक करताना दिसले.

जे सत्य दीर्घकाळ लपविण्याचा प्रयत्न केला ते समोर आणले जात आहे. ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला ते आज निषेध करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पीएम मोदींनी जामनगरच्या राजाचाही उल्लेख केला. दुसऱ्या महायुद्धात जामनगरच्या राजाने पोलंडच्या लोकांना आश्रय दिला. त्याचा परिणाम म्हणून, आज पोलंडने युक्रेनमधील आमच्या विद्यार्थ्यांना मदत केली.

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट काश्मीरातील पंडितांवरील झालेल्या अत्याचाराचे वास्तव चित्रण दाखवणारा चित्रपट आहे. हा चित्रपट बहुतांश राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

भाजपाच्या संसदीय बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींनीही चित्रपटावर भाष्य केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, द काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट व्हायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध, निषेध करत आहेत.

ज्याला चित्रपट आवडला नाही त्यांनी दुसरा चित्रपट बनवावा

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट चांगला नाही असे ज्याला वाटत असेल त्याने आपला दुसरा चित्रपट करावा, असे पंतप्रधान म्हणाले. पण त्यांना आता भीती वाटते की जे सत्य इतके दिवस दडपून ठेवले गेले, ती वस्तुस्थिती बाहेर आणली जात आहे. यामागे कोणाची तरी मेहनत आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. अशा परिस्थितीत सत्यासाठी जगणाऱ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे.

दरम्यान, त्यांनी गांधी चित्रपटाचाही त्यांनी उल्लेख केला. पहिल्यांदाच एका परदेशी व्यक्तीने गांधी चित्रपट बनवला आणि त्याला ऑस्कर मिळाले तेव्हा जगाला कळले की गांधी किती महान व्यक्ती होते.

Back to top button