पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही सकारात्मक नसू शकते. अगदी तसंच प्रत्येक प्रेमकथेचा आरंभ हा गोड होतोच असे नाही. असं म्हणतात एकमेकांचा तिरस्कार करणारी, भिन्न स्वभावाची आणि भिन्न विचारसरणीची दोन माणसं कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. पण प्रेमात द्वेषाला सुद्धा मात देण्याची ताकद असते. कधी कधी आपल्या मनामध्ये गैरसमजुतीचं जाळं असतं आणि ते काही केल्या दूर होत नाही. पण जेव्हा हे जाळं दूर होतं तेव्हा एकतर वेळ निघून गेलेली असतो किंवा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे का अशी परिस्थिती उभी राहते.
पहिल्या नजरेत आपल्याला जशी एखादी व्यक्ती दिसते ती तशी असेलच असं काही सांगता येत नाही. अगदी तसंच होणार आहे सावी आणि रमाच…अशा दोन नायिकांची कथा ज्यांचे स्वभाव, राहणीमान आणि विचार अतिशय वेगळे आहेत. एक मनमोकळी आहे तर एक बेधडक एक जरा उद्धट आहे तर एक स्पष्टवक्ती. दोघींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण आणि व्याख्या वेगळी आहे. जेव्हा या मुलींच्या आयुष्यात त्यांच्याहून वेगळ्या स्वभावाच्या दोन व्यक्ती येतील तेव्हा त्यांचं आयुष्य किती बदलेल? ज्यांची ओळखच मुळात गैरसमजुतीमधून झाली आहे. त्यांच्यात प्रेम कसं फुलेल? पण प्रेम अशक्य गोष्ट शक्य करू शकतं असं म्हणतात. आता द्वेषाच्या आभाळावर सावी आणि अर्जुनचं प्रेम कसं फुलेल? हे लवकरच कळेल.
पिरतीचा वनवा उरी पेटला चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली. सावीची भूमिका रसिका वखारकर आणि अर्जुनची भूमिका इंद्रनील कामत साकारणार आहेत. रमा राघव रोहिणी निनावे लिखित मालिकेची निर्मिती क्रिएटिव्ह ट्रान्समीडिया यांनी केली आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या शेटेचा तिखट अंदाज तर अभिनेता निखिल दामलेचा प्रसन्न गोडवा यामुळे खट्याळ प्रेमाची ही 'तिखटगोड' गोष्ट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. या धमाल युवा जोडीबरोबरच सुहिता थत्ते, गौतम जोगळेकर, शीतल क्षीरसागर, सई रानडे, प्राजक्ता केळकर, अर्चना निपाणीकर, राजन जोशी, कांचन पगारे असे कलाकार या मालिकेत आहेत.