सांगली; पुढारी वृत्तसेवा : पुढारी अॅग्रिपंढरी हे प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन दि. 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान विजयनगर येथील कृषी विभागाच्या सुमारे 40 एकरहून अधिक प्रांगणामध्ये होणार आहे.
त्याचा पीक रोपण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला. दै. पुढारी माध्यम समूह व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन दरवर्षी प्रमाणे यंदाही होणार आहे. ऑर्बिट क्रॉप सायन्सेस हे या प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत. पीक रोपण कार्यक्रमाला ऑर्बिटचे चेअरमन दीपक राजमाने, तन्मयी राजमाने, बजाज अॅग्रो अँड ऑटोचे संचालक शेखर बजाज, वाघमोडे हायटेक नर्सरीचे संचालक बापूसाहेब वाघमोडे, श्री बायोटेकचे संचालक अमर गव्हाणे उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी ऑर्बिट क्रॉप सायन्सेस यांनी प्रात्यक्षिक पिकासाठी त्यांची उत्पादने वापरली. तसेच बजाज अॅग्रो अँड ऑटो यांच्यातर्फे व्हीएसटी ट्रॅक्टरचा उपयोग करून मशागत प्रात्यक्षिक करण्यात आले.
प्रदर्शनात देश-विदेशातील 50 हून अधिक पिकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकर्यांना पहायला मिळणार आहे. प्रदर्शनात अत्याधुनिक पद्धतीने केलेली भरघोस उत्पादन देण्याच्यादृष्टीने सर्व पिके शेतकर्यांना पाहण्यासाठी तयार असणार आहेत. भाजीपाला तसेच फूलवर्गीय पिकांचादेखील यामध्ये समावेश असणार आहे. प्रदर्शनात 200 हून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे.
यामध्ये खते, बी बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, सेंद्रिय उत्पादने, सोलर पंप, मोटार पंप, ट्रॅक्टर – अवजारे यांची प्रात्यक्षिके, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, धान्य निवडक यंत्रे, अत्याधुनिक पीक अंतर्गत अवजारे, मलचिंग पेपर, शेडनेट, पाईप अशा विविध प्रकारचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत .
दै. पुढारी माध्यम समुहाने फक्त प्रदर्शन घेऊन नाहीतर देश विदेशातील 50 हून पिकांसह प्रात्यक्षिक घेऊन कृषी क्षेत्रात नवी क्रांती केली आहे. यामधून शेतकर्यांना पिके कोणती घ्यावीत, खते कोणती, बियाणे आणि पिकांच्या जाती कोणत्या, त्याचे उत्पादन कसे जास्त येऊ शकते हे शेतकर्यांना समजणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शेतकरी वर्गाला प्रदर्शन पाहण्याची उत्सुकता असणार आहे.