नगर : महिलांविषयक सामाजिक परिवर्तनाची गरज : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

नगर : महिलांविषयक सामाजिक परिवर्तनाची गरज : खासदार सुप्रिया सुळे

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाईं फुले यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाचा व स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. त्यांच्या जन्मदिनी पहिले स्री शिक्षिका साहित्य संमेलन कर्जत येथे होत आहे, त्यातून आत्मचिंतन होऊन महिलांविषयक सामाजिक परिवर्तन होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. येथील दादा पाटील महाविद्यालयात आयोजित केलेल्या पहिल्या स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनाचे उद्घाटन खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी कन्नड (जि. औरंगाबाद) येथील लेखिका प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे होत्या.

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्या मीनाताई जगधने, संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार रोहित पवार, बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, अंबादास पिसाळ, बप्पासाहेब धांडे, बाळासाहेब साळुंके, काकासाहेब तापकीर, नगराध्यक्षा उषाताई राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, जि. परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, राजेंद्र गुंड, सुभाषचंद्र तनपुरे, मधुकर राळेभात, प्राचार्य डॉ.संजय नगरकर उपस्थित होते.

यावेळी जगधने यांनी सावित्रीबाईंचे कर्तृत्व व विचार, तसेच थोर साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान सांगितले. त्यांच्यातील संवेदनशीलता आजच्या स्त्री शिक्षकांनी जोपासली पाहिजे. अशा स्री शिक्षिका साहित्य संमेलनातील विचारातून मराठी साहित्याबरोबरच मराठी माणूसही समृद्ध होण्यास मदत होईल.

फाळके यांनी स्वागत केले

आमदार रोहित पवार यांनी सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा चालवून स्रीविश्व समृद्ध केल्याचे सांगितले. त्यांच्यापासून आजच्या स्त्री शिक्षकांनी बोध घ्यावा. तसेच आजच्या काळात स्किल बेस व प्रॅक्टिकल बेसवर आधारित शिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलनाध्यक्षा डॉ. अहिरे म्हणाल्या, सावित्रीबाईंनी तत्कालीन व्यवस्थेविरुद्ध जे बंड केले, त्या निव्वळ सुधारणा नाहीत; तर ती मोठी शैक्षणिक व सामाजिक क्रांती आहे. त्यांच्या विचार व कार्याचा वसा आणि वारसा घेऊन शिक्षणाचे पवित्र कार्य आजच्या शिक्षकांनी करावे. स्रिया या खर्‍या अर्थाने संस्कार शाळा असतात. आईच्या व सावित्रीबाईंच्या डोळ्याने समाजाकडे पाहिल्यास अनेक सामाजिक प्रश्न मिटण्यास मदत होईल. सावित्रीबाई या आपल्या साहित्यातून आधुनिक मूल्य मांडणार्‍या पहिल्या कवयित्री व पहिल्या थोर शिक्षका होत. शिक्षण हे गुलामी नष्ट करणारे अस्र आहे, ते अस्त्र विद्यार्थ्यांच्या हातात देणार्‍या त्या महानायिका होत. आज शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याबरोबरच सावित्रीकरण झाले पाहिजे, असा विचारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संमेलनात मान्यवर शिक्षिकांना पुरस्कार देण्यात आले. सावित्रीबाई फुले पुरस्कार स्नेहल बाळसराफ (तळेगाव दाभाडे), फातिमा शेख पुरस्कार जस्मिन रमजान शेख (मिरज), ताराबाई शिंदे पुरस्कार सुरेखा अशोक बोराडे (नाशिक), डॉ. रखमाबाई राऊत पुरस्कार संगीता बर्वे ( पुणे), मुक्ता साळवे पुरस्कार प्रतिभा जाधव (लासलगाव), लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कार वृषाली मगदूम (मुंबई),दुर्गा भागवत पुरस्कार सरिता पवार (कणकवली), नजूबाई गावित पुरस्कार सुनीता भोसले (शिरूर), गेल आम्वेट पुरस्कार बालिका ज्ञानदेव (लोणंद), बाया कर्वे पुरस्कार शुभांगी गादेगावकर (ठाणे), भूमिकन्या पुरस्कार स्वाती पाटील (कर्जत). प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील म्हस्के, प्रा. डॉ.भारती काळे व प्रा. रामकृष्ण काळे यांनी केले.

 

Back to top button