

Kala Hiran Controversy: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि आगामी 'काळा हिरण' या चित्रपटाभोवतीचा वाद आता आणखी चिघळताना दिसत आहे. सलमान खानच्या कायदेशीर टीमने चित्रपट निर्मात्यांना नोटीस पाठवल्याच्या वृत्तांनंतर आता दिग्दर्शक भारत एस. श्रीनाथे यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे सांगत त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत ठाम भूमिका मांडली आहे.
'काळा हिरण' हा चित्रपट सलमान खानशी संबंधित 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाच्या पोस्टरपासूनच त्याची चर्चा सुरू झाली होती. पोस्टरमध्ये दिसणाऱ्या पात्राचे स्वरूप सलमान खानसारखे असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे हा चित्रपट आणि सलमान खान यांच्यातील संबंधांबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले.
या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक भारत श्रीनाथे यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, "उदयपूर फाइल्स' या चित्रपटादरम्यान मला अनेक वाद, टीका आणि कायदेशीर आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यामुळे अशा नोटिसा आता मला घाबरवत नाहीत. 'उदयपूर फाइल्स'ने मला लढायला शिकवले आहे."
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती आपल्या भूमिकेनुसार निर्णय घेत असते. "ही एक कायदेशीर नोटीस आहे आणि त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल. अशा प्रकारचे वाद पुढेही सुरू राहतील," असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनीही सलमान खानवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर कथित नोटिसेचे फोटो शेअर करत त्यांनी दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप केला. "लोकांना घाबरवणे ही त्यांची सवय असेल, पण घाबरणे माझ्या स्वभावात नाही," असे वक्तव्य त्यांनी केले.
मात्र, या संपूर्ण प्रकरणावर सलमान खान किंवा त्यांच्या कायदेशीर टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
'काळा हिरण' चित्रपटाचा टीझर 20 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटात कथित काळवीट शिकार प्रकरण, त्यानंतरचा दीर्घकालीन न्यायालयीन संघर्ष, अटक, माध्यमांमधील चर्चांचा गदारोळ आणि काही अन्य वादग्रस्त संदर्भ दाखवले जाणार असल्याची चर्चा आहे.