

Lalit Modi Sushmita Sen: आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती ललित मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच सविस्तरपणे भाष्य केले आहे. 2022 मध्ये सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आलेल्या या नात्याबाबत त्यांनी आता अनेक खुलासे केले आहेत. ब्रेकअप का झाले, इंस्टाग्राम पोस्टमागची खरी कहाणी काय होती आणि सुष्मिताला 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांबद्दल त्यांचे काय मत आहे, याबाबत त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.
'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदी म्हणाले की, सुष्मिता सेन त्यांच्या आयुष्यातील अत्यंत खास व्यक्ती आहे. "ती माझ्यासाठी खूप स्पेशल होती आणि आजही आहे. तिच्याकडून मी आयुष्यात खूप काही शिकलो. आमचं नातं खूप सुंदर होतं आणि त्याच्या अनेक गोड आठवणी आजही माझ्यासोबत आहेत," असे त्यांनी सांगितले.
ललित मोदी यांच्या मते, त्यांच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे भौगोलिक अंतर होते. सुष्मिताचे करिअर आणि आयुष्य भारतात होते, तर ते लंडनमध्ये राहत होते.
ते म्हणाले, "आमच्या नात्यात कोणतीही कटुता नव्हती. पण आमच्यातील अंतर खूप मोठं होतं. तिचं काम भारतात होतं आणि माझं आयुष्य लंडनमध्ये. त्यामुळे परिस्थिती वेगळी होती. मात्र आजही आमच्यात मैत्री कायम आहे."
सुष्मिता सेनवर अनेकदा सोशल मीडियावर 'गोल्ड डिगर' असल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र ललित मोदी यांनी हे आरोप फेटाळून लावत तिचे जोरदार समर्थन केले.
ते म्हणाले, "सुष्मिता अत्यंत यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला आहे. तिच्याकडे प्रचंड प्रमाणात हिऱ्यांचा संग्रह आहे. ती स्वतःच्या मेहनतीवर उभी राहिली आहे. तिचा स्वतःचा डायमंड व्यवसायही आहे. आम्ही एकत्र बाहेर गेलो की अनेकदा तीच बिल भरायची. त्यामुळे ती गोल्ड डिगर नव्हती, उलट मीच 'डायमंड डिगर' होतो," असं म्हणत त्यांनी विनोदही केला.
2022 मध्ये ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या नात्याची घोषणा केली होती. त्या पोस्टनंतर दोघेही प्रचंड चर्चेत आले होते.
त्या पोस्टबद्दल बोलताना मोदी म्हणाले, "एका गोष्टीवरून आमच्यात थोडी चर्चा सुरू होती. तेव्हा मी तिला सांगितलं की, मी हा फोटो पोस्ट करणार आहे. त्यावर ती हसली आणि मी पोस्ट करून टाकली. मी सार्डिनियाला जात होतो आणि ती तिच्या आईला भेटण्यासाठी लंडनला जात होती. मी पोस्ट केली आणि काही तासांतच ती राष्ट्रीय बातमी बनली."
ते पुढे म्हणाले की, सुष्मिताने कधीही ती पोस्ट हटवण्यास सांगितले नाही आणि त्यांनाही ती काढून टाकण्याची गरज वाटली नाही. "आम्ही दोघेही त्या निर्णयाबाबत समाधानी होतो. आम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
जुलै 2022 मध्ये ललित मोदी यांनी मालदीव आणि सार्डिनियातील सुट्ट्यांदरम्यान सुष्मिता सेनसोबतचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी सुष्मिताला 'बेटर हाफ' असे संबोधले होते. या पोस्टनंतर सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात मोठी चर्चा रंगली होती.
आता अनेक वर्षांनंतर ललित मोदी यांनी या नात्याबद्दल खुलेपणाने बोलत सुष्मिता सेनबद्दलचा आदर आणि आपुलकी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. ब्रेकअप झाले असले तरी मैत्री आणि परस्पर सन्मान आजही कायम असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले.