Eetha Teaser Out: नऊवारी साडी, पायांमध्ये घुंगरू, लावणीचा ठसका आणि प्रेक्षकांच्या शिट्ट्या; 'ईठा’चा टीझर पाहून चाहते थक्क

Eetha Teaser Out: श्रद्धा कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘ईठा’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Eetha Teaser Out
Eetha Teaser OutPudhari
Published on
Updated on

Eetha Teaser Out: बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री’ बनून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आता एका पूर्णपणे वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत मोठ्या पडद्यावर परत दिसणार आहे. तिच्या बहुप्रतीक्षित ‘ईठा’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात श्रद्धाचा आतापर्यंतचा सर्वात प्रभावी आणि भावनिक अभिनय पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

टीझरमधील 'पड़ी-पड़ी मरी तो बेचारी, नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी' हा संवाद श्रद्धाच्या आवाजात ऐकू येताच अंगावर शहारे येतात. संघर्ष, वेदना, कला आणि स्वाभिमान यांची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाने पहिल्याच झलकमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

विठाबाई नारायणगावकरांची प्रेरणादायी कहाणी

‘ईठा’ हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आपल्या कलेच्या जोरावर लाखो रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या विठाबाईंनी लावणीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या कलाक्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना 1990 मध्ये राष्ट्रपतींकडून सन्मानित करण्यात आले होते.

विठाबाईंचे आयुष्य केवळ प्रसिद्धीचे नव्हते, तर त्यामागे संघर्ष, आर्थिक चढ-उतार आणि समाजाशी दोन हात करण्याची जिद्द होती. हीच कथा आता मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे.

नऊवारी साडी आणि लावणीचा ठसका

दोन मिनिटांहून अधिक कालावधीच्या टीझरमध्ये श्रद्धा कपूरचा संपूर्ण कायापालट पाहायला मिळतो. पारंपरिक नऊवारी साडी, लावणीचा ठसका, डोळ्यांतील भाव आणि वेदना यांचे तिने केलेले सादरीकरण लक्ष वेधून घेत आहे.

लावणीच्या रंगीबेरंगी जगामागील कठोर वास्तव, कलाकारांना सहन करावे लागणारे संघर्ष आणि विठाबाईंच्या आयुष्यातील भावनिक क्षण यांची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

Eetha Teaser Out
Raja Shivaji OTT Release: 100 कोटींचा विक्रम करणारा ‘राजा शिवाजी’ आता OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

श्रद्धा कपूरची परफेक्ट निवड

या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरची निवड का झाली, यामागे तिची मराठी पार्श्वभूमीही महत्त्वाची मानली जात आहे. श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापूरे या मराठी कुटुंबातील आहेत. त्यामुळे श्रद्धाला मराठी भाषा आणि संस्कृतीची चांगली जाण आहे.

याशिवाय श्रद्धाचा संबंध भारतीय संगीतविश्वातील दिग्गज मंगेशकर कुटुंबाशी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी तिचे नाते अधिक घट्ट असल्याचे मानले जाते.

28 ऑगस्टला थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा आणि मोहम्मद झीशान अयूब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दमदार पार्श्वसंगीत, भव्य सिनेमॅटोग्राफी आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा आत्मा जपणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

‘ईठा’कडून मोठ्या विक्रमांची अपेक्षा

टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहता ‘ईठा’ हा केवळ एक बायोपिक नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला मोठ्या पडद्यावर पुन्हा जिवंत करणारा चित्रपट ठरू शकतो. श्रद्धा कपूरच्या कारकिर्दीतील हा सर्वात आव्हानात्मक आणि संस्मरणीय अभिनय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news